आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्तीचे सर्वात प्रभावी साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले. त्यांनी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांची सोय करणारी महाविद्यालये स्थापन केली आणि समाजातील दुर्बल घटकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यात अत्यंत महत्त्वाची आणि प्रेरक भूमिका बजावली. महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असून, या निमित्ताने जातीयतेपासून मुक्त आणि भेदभावविरहित समाज घडविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणूनही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूलभूत अधिकार, अस्पृश्यता निर्मूलन यांसारख्या घटनात्मक तरतुदी सुनिश्चित केल्या. डॉ. आंबेडकर हे समानतेचे प्रणेते होते. त्यांनी महिलांच्या हक्कांचे समर्थन केले, शिक्षण, मालमत्ता आणि वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये समान संधींचा पुरस्कार केला. त्यांच्यामुळेच भारताने प्रजासत्ताक झाल्याच्या पहिल्या दिवसापासून महिलांना समान मतदानाचा अधिकार दिला, इंदू मिल कंपाऊंडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित भव्य स्मारक उभारण्याच्या प्रगतीबद्दल जाणून मला आनंद झाला. मला खात्री आहे की, हे स्मारक विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांच्या पिढ्यान् पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरेल", असेही राज्यपाल याप्रसंगी म्हणाले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दादर स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक येथे महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महापौर रितू तावडे, मंत्रिगण, प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर, तसेच अन्य मान्यवरांनी आज पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. आशिष शेलार, कौशल्य - रोजगार - उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी मंत्री विजय (भाई) गिरकर, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, माजी खासदार राहुल शेवाळे, अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष डॉ. राहुल बोधी महाथेरो, माजी मंत्री दीपक केसरकर, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस महासंचालक डॉ. सदानंद दाते, उपआयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, आदींसह समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले,”डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आपण जेवढं अभिवादन करू तेवढं कमी आहे. कारण एक व्यक्ती किती मोठं परिवर्तन घडवू शकतो, हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं व्यक्तिमत्व आहे की, जगाच्या पाठीवर जर कुठल्या एका व्यक्तीच्या जयंतीचे सर्वाधिक कार्यक्रम होत असतील, तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होतात. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे सगळे कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे कार्यक्रम एक प्रकारे त्यांच्या कार्याला दिलेली मानवंदना आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रबंध "प्रॉब्लेम्स ऑफ द इंडियन रुपी" (Problems of the Indian Rupee) या प्रबंधामध्ये त्यांनी भारतामध्ये एक सेंट्रल बँक असण्याची आवश्यकता नमूद केली होती. दुसरं त्यांनी सांगितलं होतं की वर्षानुवर्ष आपल्या करन्सीचं (चलनाचं) सिल्व्हर स्टँडर्ड आहे, ते संपवलं पाहिजे आणि गोल्ड स्टँडर्ड केलं पाहिजे. आणि तिसरं त्यांनी हे सांगितलं होतं की, विनिमय दर बघू नका, करन्सीची परचेसिंग पॉवर (चलनाची खरेदी क्षमता) बघा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन १९२३ साली जे मांडलेले होते, ते आजच्या ग्लोबलाईज्ड अर्थकारणामध्येही सगळ्यात महत्त्वाचे ठरत आहे. आपल्या संविधानाने आपली अर्थव्यवस्था उभी केली आहे आणि म्हणूनच आता आपण जगातली तिसरी अर्थव्यवस्था होतो आहोत आणि लवकरच दुस-या स्थानाकडे आणि पहिल्याकडे आपण वाटचाल करणार आहोत. त्या वाटचालीला दिशा देणारं आहे आपलं संविधान आणि ते संविधान लिहिणारे आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच्या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, "चैत्यभूमीवर आज भीमसागर लोटला आहे. आणि या सर्व भीमसागराला माझा जयभीम. आज एका प्रज्ञासूर्याची प्रार्थना करायला आपण सारे जमलो आहोत, त्यांना वंदन करायला आपण जमलो आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा स्वातंत्र्यसूर्य. आजचा हा पवित्र दिवस केवळ एका महामानवाचा जन्मदिवस नाही, तर संपूर्ण भारताच्या विवेकाचा आणि स्वाभिमानाचा उत्सव आहे. बाबासाहेबांनी देशाला स्वाभिमान दिला. समानता आणि मानवतेची दिशा दाखवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेब हे संविधानाचे शिल्पकार तर आहेतच, पण ते आधी माणुसकीचे देखील शिल्पकार आहेत.
महापुरुष शांततेतून जेव्हा कृती करतात, तेव्हा ती क्रांती ठरते. महाड चवदार तळे सत्याग्रहातून समाजात आत्मसन्मानाची जाणीव निर्माण झाली. बाबासाहेबांनी आयुष्यभर शोषित, दलित आणि वंचित घटकांसाठी काम करून त्यांना सक्षम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे भारताची लोकशाही जगात भक्कमपणे उभी आहे. इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम वेगाने सुरू असून हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतभर साजरी होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही स्वाभिमान आणि विवेकाचा उत्सव असून त्यांचे विचार जपणे आणि ते आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हाच आपला राष्ट्रधर्म असून बाबासाहेब हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून माणुसकीचेही शिल्पकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे देशातील शेवटच्या माणसालाही न्याय आणि सन्मान मिळण्याचा मार्ग सुकर झाला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,”आजचा दिवस केवळ एक महापुरुषाचा जन्मदिन नाही, तर तो या देशातील प्रत्येक शोषित, वंचित आणि स्त्रीच्या सन्मानाचा उत्सव आहे. हा दिवस केवळ स्मृतीचा नाही तर प्रेरणेचा, संकल्पांचा आणि आपल्या कृतज्ञतेचा दिवस आहे. बाबासाहेबांच्या अलौकिक कार्याचे विचारांचे स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे. आणि ज्ञानाच्या आणि स्वाभिमानाचा आणि समतेचा उत्सव आहे. मुंबईची ही चैत्यभूमी केवळ एक स्मारक नाही तर ती एक ऊर्जा केंद्र आहे. दरवर्षी इथे येणारा भीम अनुयायी हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची मशाल मनात घेऊनच येतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते आणि सामाजिक न्यायाचे, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि शिक्षण, संघटन, संघर्षाचे प्रतीक होते.
बाबासाहेबांनी मांडलेले हिंदू कोड बिल हे भारतातील महिलांच्या प्रगतीचे मोठे पाऊल होते. आज मी एक महिला म्हणून या पदावर सन्मानाने उभी आहे त्याचे श्रेय बाबासाहेबांनी दिलेल्या हक्कांना जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. एकता, समता आणि बंधुता या मूल्यांमध्ये समाजाला बांधून त्यांनी प्रत्येकाला सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांची मशाल सतत तेवत ठेवून त्यानुसार आचरण करणे गरजेचे आहे. इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक जगाला शांतता आणि समतेचा संदेश देणारे केंद्र ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.”.
चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट दिली. या प्रदर्शन दालनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातील दुर्मिळ छायाचित्रे असून प्रदर्शन दालनात संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक जीवनचरित्रावर आधारित कॉफी टेबल बुक देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. दरम्यान आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बृहन्मुंबई महानगरपालिका संगीत कला अकादमीतर्फे बुद्धवंदना सादर करण्यात आली. त्याचबरोबर विविध भीम गीतेदेखील सादर करण्यात आली.

0 टिप्पण्या