गेले ३-४ दिवस ठाण्यातील मामलेदार मिसळीची इमारत पाडली म्हणून सोशल मीडियावर पोस्ट, रिल्स यांना अगदी पूर आलाय. ठाण्याची ओळख म्हणजे मामलेदार मिसळ हे मान्य केलं तरी या नॉस्टॅल्जिक हंबरड्यामध्ये तिथेच असलेली ठाण्याच्या इतिहासाची आणखी एक उरलीसुरली खूण नामशेष झाल्याचं मात्र कोणाच्याही गावी नाही .
मुरुडेश्वर शेठनी ८०-९० वर्षांपूर्वी मामलेदार कचेरीची सोय व्हावी म्हणून, त्यांच्याच विनंतीवरून हे कॅन्टीन सुरू केलं. पुढे इथली मिसळ अतिशय लोकप्रिय झाली आणि मामलेदार मिसळ हा जणू ठाण्याचा फूड आयकॉन ठरला. पण मुर्डेश्वरांनी ज्या मामलेदार कचेरीच्या ओसरीत आपलं कॅन्टीन थाटलं ते मामलेदार कार्यालय तिथे कधी आलं ? मामलेदार कचेरीसाठी वापरली जाणारी वास्तू मुळात काय होती? तर १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पहिल्या गॅझेटियर मध्ये ब्रिटिशांनी नोंद केली आहे की तो मराठ्यांच्या राजवटीत बांधलेला हिराकोट (गॕझेटमध्ये डायमंड फोर्ट असा उल्लेख आहे.) नावाचा छोटा किल्ला होता. खाडीच्या किनाऱ्यावर चौकी म्हणून उभारलेल्या या हिराकोट मध्ये मराठ्यांनी तुरुंग केला होता. ब्रिटिशांनी १७७४ मध्ये ठाणे जिंकल्यानंतर हिराकोट मधला तुरुंग ठाण्याच्या किल्ल्यात नेला आणि ठाणे किल्ल्याचे रुपांतर मध्यवर्ती कारागृहात झाले. हिराकोट मध्ये ब्रिटिशांनी तहसीलदार- मामलेदार कचेरी थाटली ती १८६२ मध्ये . त्यामुळे पुढच्या काही वर्षांत हिराकोट नावाचा किल्ला जनमानसाच्या स्मृती मधून पुसला गेला. आधी ब्रिटिशांनी आणि नंतर भारतीय शासकांनी हिराकोट मध्ये बदल करून सरकारी कार्यालयात रुपांतर केलं. मात्र अगदी आत्तापर्यंत म्हणजे नोव्हेंबर २०२५ मध्ये ते कार्यालय पडेपर्यंत तिथे जे नगर पोलीस स्टेशन होतं ते किल्ल्यातल्या जुन्या दगडी खोल्यांमध्येच होतं.
शासकीय नूतनीकरण प्रकल्पात ही ऐतिहासिक वास्तू आधी पाडण्यात आली आणि मग दारातलं कॅन्टीन अर्थात मिसळीचं हॉटेल पाडण्यात आलं. नवीन संकुलात, नवीन थाटात मामलेदार मिसळ पुन्हा सुरू होईल. पण हिराकोट मात्र कायमचा नष्ट झाला. चटपटीत रिल्स बनवणाऱ्यांना हा इतिहास माहितीच नसल्याने सगळे फक्त मिसळीच्या नावाने गळे काढत आहेत.
मामलेदार कचेरी, शेजारचे पी डब्ल्यू डी कार्यालय या सगळ्या शासकीय इमारती पाडून नवीन बांधण्याच्या धडाक्यात याच भागातली आणखी एक ऐतिहासिक वास्तू कायमची नष्ट झाली आहे, याचा कोणाला पत्ताच नाही. ही वास्तू म्हणजे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या शेजारी असलेली गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूलची इमारत. १ फेब्रुवारी १९२१ रोजी या शाळेची स्थापना झाली . ही ठाणे जिल्ह्यातील पहिली फक्त मुलींची शाळा होती. ज्या इमारती मध्ये शाळा भरत असे ती इमारत जिल्हा परिषदेच्या मालकीची होती, त्यामुळेच नूतनीकरणात पाडली गेली. या गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल मध्ये ठाण्याच्या विविध क्षेत्रात चमकलेल्या महिला घडवल्या होत्या. पण हिराकोट बरोबर ही खूण ही आता कायमची पुसली गेली.
कालाय तस्मै नम: हेच खरं.
--- मकरंद जोशी
0 टिप्पण्या