Top Post Ad

हिंदुत्ववाद्यांचे इतिहासकार गजानन मेहेंदळे हे “शिवाजी” या एकेरी उल्लेखाविषयी काय म्हणतात

“प्रस्तुत शिवचरित्रात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा उल्लेख बहुतेक सर्व ठिकाणी एकेरी म्हणजेच नुसता शिवाजी असा केलेला आहे. तसे करण्यामागे त्यांच्याविषयी माझ्या मनात काही अनादराची भावना आहे, किंवा कोणाच्या भावना दुखवावयाचा हेतू आहे, असा गैरसमज कृपया कोणी करून घेऊ नये. एकेरी उल्लेख हा काही केवळ अनादरापोटी केला जातो असे नाही. परमेश्वराचा, राम-कृष्णांसारख्या पौराणिक, आणि चंद्रगुप्त, हरिहर-बुक्क, राणा प्रताप यांच्यासारख्या ऐतिहासिक, महापुरुषांचा आणि आपल्या आईवडिलांचा उल्लेख आपण सर्रास एकेरी करतो. अर्थात एकेरी उल्लेख करणे म्हणजे मनात अनादर असणे असे समीकरण मांडणे युक्त नाही. माझ्या लहानपणी मुले ‘शिवाजी म्हणतो’ असा एक खेळ खेळत असत. ‘शिवाजी म्हणतो’ असे म्हणून दिलेल्या आज्ञा पाळायच्या, तसे न म्हणता दिलेल्या आज्ञा पाळायच्या नाहीत, असे त्या खेळाचे स्वरूप होते. हा खेळ हे शिवाजी महाराजांविषयी लोकांच्या मनात असलेल्या गाढ आदराचेच द्योतक आहे. तरीही त्या खेळात ‘शिवाजी म्हणतो’ असा एकेरी वाक्प्रयोग केला जात असे.

प्रस्तुत शिवचरित्रात शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यामागील कारण असे आहे:— हे शिवचरित्र मी इतिहाससंशोधनाच्या दृष्टिकोनातून लिहिले आहे. असे चरित्र लिहिताना लेखकाने भाविक राहू नये, शक्य तेवढ्या तटस्थ वृत्तीने ते लिहावे, अशी अपेक्षा असते. पूर्णत: तटस्थ वृत्तीची अशी कोणती व्यक्ती असली तर ती क्वचितच असेल. बहुतेकांच्या मनावर कोणत्या ना कोणत्या पूर्वग्रहांचा थोडाबहुत पडसाद असतो. माझ्याही मनात कोणते ना कोणते पूर्वग्रह असतीलच. त्या संबंधी मला जाणीव आहे असेही नाही, असली तर ते काढून टाकण्याचा मी प्रयत्न केला असता. पण असे पूर्वग्रह असले तरी ते काबूत ठेवण्याचा प्रयत्न ऐतिहासिक चरित्र लिहू पाहणाऱ्याने अवश्य केला पाहिजे. किंबहुना चरित्रनायकाविषयी त्याला जितका अधिक आदर वाटत असेल तितक्याच प्रमाणात त्याने आपली तटस्थता टिकवून धरण्याची अधिकाधिक काळजी घेतली पाहिजे. तसे न केल्यास त्या चरित्रातील ऐतिहासिकता केव्हाच लोप पावली आणि त्या चरित्राला कथा-कादंबरीचे किंवा निबंध स्तुतिस्तोत्राचे स्वरूप केव्हा आले ते त्याचे त्यालाही कळणार नाही.

अशा स्तुतिस्तोत्रे लिहू नयेत असे माझे मत नाही. ज्याला तसे लेखन करण्याची आवड असेल त्याने तसे लेखन अवश्य करावे. पण मला तसे लेखन करण्याची आवड नाही आणि तसे प्रासादिक लेखन करण्याकरिता जरूर असलेले भाषाप्रभुत्वही माझ्या अंगी नाही. मी लिहिले आहे ते साधे ऐतिहासिक चरित्र आहे. म्हणूनच त्यात जास्तीतजास्त तटस्थता राखण्याकरिता मी शिवाजी महाराजांचा आणि सामान्यतः इ. स. १८५० पूर्वीच्या बहुतेक सर्व व्यक्तींचा उल्लेख सर्रास एकेरीच केला आहे. ज्ञानेश्वर-तुकारामांसारख्या काही संतांचा उल्लेख तेवढा सर्वत्र अनेकवचनीत केला आहे. हा खुलासा वाचल्यानंतरही प्रस्तुत शिवचरित्रातील शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि तसा उल्लेख करण्यामागील माझ्या हेतूचा विपर्यास करू नये अशी विनंती करतो.
गजानन भास्कर मेहेंदळे
( श्री राजा शिवछत्रपती खंड १ च्या प्रस्तावनेतून

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com