जाहीर आवाहन
ठाणे महानगरपालिकेने राज्य शासनाच्या सहकार्य व मार्गदर्शनानुसार शहरातील अनधिकृत /झोपडपट्टी / संमिश्र वसाहतींचा सुनियोजित पुनर्विकास करण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे संकलित केलेली आहेत.
१. समूह पुनर्विकास योजनेअंतर्गत २ डिसेंबर, २०२० च्या आधीपासूनअस्तित्वात असलेले सर्व वसाहतीतील सदनिका / व्यावसायिक गाळे पात्र ठरतात.
२. फक्त समूह पुनर्विकास योजनेअंतर्गत पहिल्या व वरील मजल्यांवरीलसदनिकादेखील पात्र ठरतात. (अश्या सदनिका झोपडपट्टी योजने मध्ये SRA मध्ये पात्र ठरत नाहीत.)
३. प्रस्तावित पुनर्विकास हा संपूर्ण वसाहतीचा मास्टर प्लॅन करून सर्व सार्वजनिक सुविधांसह टप्प्या-टप्प्यात करण्यात येणार आहे.
४. नियोजित प्रकल्पामध्ये शक्यतो कोणालाही ट्रांसिट पर्यायामध्ये हलविण्यात येणार नाही. प्रथम टप्प्यात ज्या इमारती पूर्ण होतील त्यामध्ये सरळ मालकी हक्काने सदनिका / गाळा दिला जाईल. ट्रांसिट जर अपरिहार्य असेल तर आवश्यकतेनुसार अंमलबजावणी संस्थेमार्फत तरतूद करण्यात येईल.
५. या प्रकल्पामध्ये सध्या रहिवास करीत असलेल्या प्रत्येक पात्र सदनिकेसाठी मालकी हक्काची किमान 323 चौ. फूट चटई क्षेत्राची अधिकृत सदनिका UDCPR मधील नियमानुसार देण्यात येणार आहे. त्यासाठी रहिवाश्याकडून कोणतेही शुल्क / किंमत वसूल केले जाणार नाही. अर्थात मालकी हक्काची नवीन इमारतीमधील सदनिका मोफत दिली जाणार आहे.
६. प्रकल्प नियोजनामध्ये सध्या आपण राहत असलेल्या चाळी / ब्लॉकनुसारच नवीन इमारतीमध्ये मालकी हक्काच्या सदनिका वितरित केल्या जातील. तसेच इमारतीनिहाय सदनिका धारकांची सोसायटी रजिस्टर करून देण्यात येणार आहे.
७. प्रकल्प नियोजनामध्ये शक्यतो एकाच उपविभागातील सध्याच्या रहिवाश्यांना, प्रस्तावित पुनर्वसनामधील एकाच उपसंकुलात सदनिका वाटप करण्याचे प्रयत्न राहतील.
८. पुनर्विकास प्रकल्प संपूर्ण वसाहतीचा असल्याने नियोजित प्रकल्प रहिवाश्यांना मोठे रस्ते, मैदाने, उद्याने व इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत.
९. तसेच पुनर्वसनातील प्रत्येक उपसंकुलामध्ये बांधीव स्वरूपाच्या पुढील सुविधा देण्यात येणार आहेत उदा. पाळणाघर, ज्येष्ठ नागरिक केंद्र, व्यायामशाळा, वाचनालय, ग्रंथालय, बहुद्देशीय हॉल, सोसायटी ऑफिस, इत्यादी
१०. पुनर्वसनात उपसंकुलामध्ये बगीचा व मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा ठेवण्यात येणार असून या ठिकाणी वेगवेगळे उत्सव साजरे करण्यासाठी सुविधा राहील. या सुविधांची मालकी रहिवाश्यांच्या फेडरेशनची राहील.
११. पुनर्वसनातील प्रत्येक उपसंकुलासाठी पार्किंगची नियमानुसार सोय ठेवण्यात येणार असून त्याची मालकी सोसायटी / फेडेरेशनची राहणार आहे.
१२. सदर प्रकल्प टप्पेनिहित तीन टप्प्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे व रहिवाश्यांनी सहकार्य दिल्यास प्रत्येक टप्पा 3 ते 4 वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.
१३. प्रथम टप्प्यातील काम शक्यतोसदर URPच्या क्षेत्रात मोकळ्या भूखंडावर सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे आपणास आपल्या समोरच कामाची दैनंदिन प्रगती व दर्जा पाहावयास मिळणार आहे. सबर योजनेत प्रथम आपली घरे तोडण्यात येतील अशी धारणा चुकीची आहे. पर्यायाने सदर योजना राबविताना अथवा योजना पूर्ण झाल्यानंतर आपणास आपला विभाग सोडून इतरत्र पाठविण्यात येणार नाही.
१४. वरीलप्रमाणे योजनेअंतर्गत मिळणारी मालकी हक्काची सदनिका ही सदनिकाधारकाच्या नावे करण्यात येणार आहे व ज्या कुटुंबात सदनिकाधारक हयात नसल्यास ती संबंधित हयात कायदेशीर पात्र व्यक्तीच्या नावे करण्यात येणार आहे.
१५. शासनाच्या नवीन नियमानुसार अशा प्रकारे मालकी हक्काने मिळणारी सदनिका / गाळा पुढील 5 वर्षे विकता येणार नाही. तथापी तत्पुर्वी महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगीने काही अटी / शर्तीस अधिन राहून हस्तांतरण / विक्री करता येईल.
१६. व्यावसायिक गाळेधारकांस सध्या जे क्षेत्र वापरात आहे तितक्या क्षेत्राचा नवीन इमारतीत गाळा UDCPR मधील नियमानुसारमालकी हक्काने देण्यात येणार आहे.
१७. सदर पुनर्विकास योजनेत मालकी हक्काने उपलब्ध करून देण्यात येणारी सदनिका / गाळा, हा First Come First Served म्हणजेच ज्याची पात्रता प्रथम टप्प्यात पूर्ण होईल त्यांना प्रथम टप्प्यात देण्यात येईल.
१८. मानपाडा वसाहतीलगत व वसाहतीमधून मुंबई मेट्रो व त्यांचे स्थानक, ठाणे वर्तुळाकार मेट्रो व आझादनगर स्थानक, बोरिवली-ठाणे रस्ता व संलग्न रस्ते उभारण्याचे काम सुरु असल्याने या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मानपाड्यातीलरहिवाश्यांना प्रथम टप्यात प्राधान्य दिले जाईल.
१९. नियोजित प्रकल्पातील सर्व सार्वजनिक बांधीव सुविधा व मनोरंजनाची मैदाने / बगीचे या सुविधांची निगा व देखभाल ठाणे महानगरपालिका करणार आहे.
२०. नियोजित प्रकल्पात रहिवाश्यांच्या सोसायटीची मालकी असलेल्या इमारती व उपसंकुल यांची दैनंदिन निगा व देखभाल करण्यासाठी शाश्वत पद्धतीने संस्थात्मक नियुक्ती करण्याचा ठाणे महानगरपालिकेचा मानस आहे.
क्लस्टर योजनेतील सर्व रहिवाश्यांच्या प्रबोधनासाठी ठाणे महानगरपालिका वरील वस्तुतः माहिती देत आहे. तसेच वरीलप्रमाणे योजनेचा फायदा घेण्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या सर्वेक्षणात आपण सहकार्य करून, आपले कुटुंब / सदनिका / गाळा इत्यादीबाबत कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध करून माहिती देणे अपेक्षित आहे.
ठाणे शहरातील क्लस्टर योजनेतून उपलब्ध होणाऱ्या पुनर्वसन प्रकल्पाचे फायदे व मालकी हक्काची सदनिका / गाळे आपणाला मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. तरी आपण या योजनेस संपूर्ण सहकार्य करून या संधीचा आपले शाश्वत भविष्य घडविण्यासाठी फायदा घ्यावा असे महानगरपालिकेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
मा. उप आयुक्त (क्लस्टर सेल) यांच्या मान्यतेने
(सोमनाथ बनसोडे) सहाय्यक आयुक्त, क्लस्टर सेल, ठाणे महानगरपालिका, ठाणे
0 टिप्पण्या