Top Post Ad

शिष्यवृत्ती परीक्षेचा “शहापूर पॅटर्न” ... नियोजन, सामाजिक सहभाग आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमातून घडले यश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी (PUP) व इयत्ता ८ वी (PSS) शिष्यवृत्ती परीक्षेच्या २०२६ च्या अंतरिम निकालामध्ये शहापूर तालुक्याने पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अत्यल्प साधनसामग्री, दुर्गम व आदिवासी भागातील शाळा आणि मर्यादित संसाधने असूनही शहापूर तालुक्याने “शिष्यवृत्ती परीक्षेचा शहापूर पॅटर्न” राज्यासमोर उभा केला आहे.

इयत्ता ५ वीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (PUP) परीक्षेत शहापूर तालुक्यातील तब्बल २५६ विद्यार्थी पात्र ठरले असून ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक यश संपादन केले आहे. तसेच इयत्ता ८ वीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (PSS) परीक्षेतही शहापूर तालुक्यातील ८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील एकूण पात्र विद्यार्थ्यांमध्ये शहापूर तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. या यशामागे शिक्षकांचे नियोजन, सामाजिक संस्थांचे सहकार्य, पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अस्नोलीने यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्ता परंपरा कायम राखली आहे. शाळेचे तब्बल ३० विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला आहे. शहापूर तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अनेक सामाजिक संस्था, उपक्रमशील शिक्षक आणि शैक्षणिक संघटना एकत्र येऊन नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करत आहेत.  शिक्षकांना शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, विद्यार्थ्यांचा गौरव करणे, अतिरिक्त वेळ देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे तसेच सराव परीक्षांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे अशी महत्त्वपूर्ण भूमिका ही संस्था बजावत आहे.

 सेवा सहयोग संस्था, फॅन्ड्री फाउंडेशन, श्रीसत्यसाई सेवा संस्था तलवाडे-ठाणे यांसारख्या संस्थांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक पुस्तके आणि प्रश्नसंच मोफत उपलब्ध करून दिले. जाणीव प्रतिष्ठान, दीपस्तंभ प्रतिष्ठान आणि स्व. काशिनाथ भोईर प्रतिष्ठान यांनी स्वतंत्रपणे शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. आदिवासी उन्नती मंडळ, मुंबई यांच्या माध्यमातून तालुक्यातील निवडक विद्यार्थ्यांना दर रविवारी शहापूर येथे बोलावून तज्ज्ञ शिक्षकांकडून मोफत मार्गदर्शन दिले जाते. तालुक्यातील अनेक प्राथमिक शिक्षक या उपक्रमात विनामूल्य सेवा देतात. याशिवाय दरवर्षी यशस्वी विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरवही केला जातो.

तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांनी एकत्र येत “ज्ञानकुंभ टीम” ची स्थापना केली. या टीमने स्वतःची शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुस्तके आणि प्रश्नसंच तयार केले. आदिवासी उन्नती मंडळ आणि जाणीव प्रतिष्ठान यांनी या पुस्तकांच्या छपाईचा संपूर्ण खर्च उचलून ती पुस्तके शहापूर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये मोफत वितरित केली.ज्ञानकुंभ टीमचे सुधाकर पाटील सर म्हणाले, “नियोजनबद्ध प्रयत्न आणि सातत्यपूर्ण सरावामुळे शहापूर तालुका महाराष्ट्रात सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवणारा तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. हेच विद्यार्थी पुढे JEE Main, JEE Advanced सारख्या स्पर्धा परीक्षांमध्येही यशस्वी होत आहेत. आजपर्यंत शहापूर तालुक्यातील ३५ पेक्षा अधिक विद्यार्थी IIT, NIT सारख्या नामांकित संस्थांमध्ये पोहोचले आहेत.”

“शिष्यवृत्ती परीक्षा ही केवळ गुणांची स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, सातत्य आणि आत्मविश्वासाची खरी चाचणी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि पालक-शिक्षकांचे सहकार्य मिळाल्यास विद्यार्थी राज्यस्तरावरही यश मिळवू शकतात. शहापूर तालुक्याने केलेली प्रगती ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रेरणादायी दिशा आहे.”- शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक डॉ. हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर 

शेलवली बांगर जिल्हा परिषद शाळेची 8 वी वर्गातील विद्यार्थिनी जिया हलपतराव हिने मिशन भरारी, NMMS आणि शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. ती सांगते, “आमच्या शाळेत जादा तासिका, शनिवार व रविवारी विशेष वर्ग, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि आदर्श परिपाठ यांसारखे उपक्रम सातत्याने राबवले जातात. शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि नियोजनामुळे मला हे यश मिळाले.” - जिया हलपतराव – जिल्हा परिषद शाळांमधून जिल्ह्यात प्रथम

जि. प. प्राथमिक शाळा आष्टे, केंद्र ठुणे येथील इयत्ता ५ वीचा विद्यार्थी कु. जितेंद्र रवि करण याने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा आणि मिशन भरारीमध्ये यश संपादन केले. तो सांगतो, “दररोज पहाटे उठून अभ्यास करणे, शाळेतील गटअभ्यास, रविवारी व सुट्ट्यांमध्ये शिक्षकांनी घेतलेले जादा तास, Google Meet वरील ऑनलाइन मार्गदर्शन, नियमित सराव परीक्षा आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला. या सर्वांच्या मेहनतीमुळे मला हे यश मिळाले.”

शहापूर तालुक्याने सिद्ध करून दाखवले आहे की, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मोठ्या शहरांची किंवा महागड्या सुविधांची गरज नसते. योग्य नियोजन, शिक्षकांची तळमळ, सामाजिक संस्थांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचा जिद्दीचा प्रवास यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही राज्यस्तरावर चमकदार यश मिळवू शकतात. आज “शिष्यवृत्ती परीक्षेचा शहापूर पॅटर्न” हा केवळ निकालांचा विषय राहिलेला नसून ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतील सकारात्मक परिवर्तनाचे प्रेरणादायी उदाहरण बनला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या विकासासाठी शिष्यवृत्ती प्रक्रिया ही "शहापूर पॅटर्न" पध्दतीने संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. मिशन भरारी, एनएमएमएस, तसेच नवोदय शिष्यवृत्ती राबविण्यासाठी विद्यार्थ्यांना मोलाचे मदत होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांचे यानिमित्ताने अभिनंदन - मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव 

-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com