प्रिय हभप संग्राम भंडारे,
जय हरी,
-आपले नाव मी बरेच दिवसांपासून ऐकत होतो. आज आपल्या हातातल्या काळ्या शाईनिशी प्रत्यक्ष दर्शन झाले. खूप खूप आनंद वाटला. लवांडे उभे आहेत आणि आपण त्यांना साक्षात विठोबाचे रूप देताय हा किती सुंदर योग याची देही याची डोळा पहाण्याचा. लवांडेना तुम्ही या भूमीचा आवडता देव *विठोबा करून टाकले. निदान हिरवी शाई तरी वापरायला हवी होती माऊली.
-प्रिय भंडारे, तुकोबा विठ्ठलमय झाले होते. म्हणजे विठोबाच झालेले. ते म्हणत, देवाचे नाव घेतल्याने माणूस देव होतो. #गाडगेबाबा आपल्या कीर्तनात हे उदाहरण देत. गाडगेबाबा कदाचित तुम्हाला ठाऊक असतीलच ? म्हणजे असे प्रश्न या काळात विचारावे लागतात.
तुकोबांनी आयुष्यभर माणसातल्या देवत्वाची पूजा केली. माणसांना स्वत्वाची जाणीव दिली. देव गाभाऱ्यात नाही तर मनात आहे.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ।
कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे । -हे तर आपल्या तुकोबानेच सांगितलंय ना ! आपण कीर्तनकार आहात. शेकडो अभंग आपल्याला तोंडपाठ असतील. अभंग पाठ असणे ही तशी तांत्रिक गोस्ट. दहावीस अभंग, हरिपाठ पाठ करून आपल्या गावगाड्याला नासवणारे हजारो तथाकथित ह.भ.प. आज विठ्ठल कृपेने तयार झाले आहेत. नोकरी नाही, धंदा शेती करण्याची इच्छा नाही. मग हा एक सोयीस्कर मार्ग. *अभंग आपल्यात रुजवून घेणे हे किती जणांना जमते संग्रामजी ? बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचे न्यून सांगत तुकोबा आपल्यात रुजवून घेतला. म्हणूनच त्यांच्या नियतकालिकांवर ते तुकोबांचे अभंग छापत असत. आपल्या शासनानेच ही प्रकाशने केली आहेत. आपण ती पाहिलीत का ? कदाचित आपल्या प्रचंड व्यस्त कारभारात ती पहायची राहून गेली असतील तर अवश्य पहा.
खरा #भागवत धर्म काय आहे महाराज ? म्हणजे लवांडेवर काळी शाई ओतणे, त्यांना शिव्या देणे वगैरे सगळे बघूनही मी तुम्हाला महाराज म्हणतो. काही परंपरा इच्छा नसूनही पाळायला हव्यात. भागवत धर्म हा विषमते विरुद्ध केलेल्या एका विद्रोहाचे रुप आहे. विद्रोह म्हणजे खून करणे, शिव्या देणे, अंगाला काळे फासणे असेच काही नसते. तसे असते तर कबीर, फुले, गांधीजी, विठ्ठल रामजी शिंदे , बाबासाहेब खुनी व्हायला हवे होते.
तर हा #विद्रोह पहिल्यांदा ज्ञानोबांनी केला तो देखील ब्राम्हणी सत्तेविरोधात. तथाकथित ब्राह्मणी मिरासदारी असणारी संस्कृत त्यांनी नाकारली आणि तिला लोकभाषेचे वळण दिले. याच ज्ञानोबांना याच ब्राह्मणी सत्तेने #समाधी घेई पर्यंत छळले. किंबहुना त्यांना समाधी घ्यायला लावली. ती एका परीने त्यांची आत्महत्याच होती असे आम्ही मानतो. तिला आपण 'संजीवन समाधी' असे म्हणून उदात्तीकरण करतो. चुकीच्या गोष्टींचे उदात्तीकरण करण्यात आपण कधीही माघार घेत नाही. तुकोबा, नाथ महाराज सगळ्यांचे वेगवेगळ्या रीतीने हेच झाले. याचा हभप म्हणून कधी आपण विचार केला काय माऊली.
#माऊली हा किती श्रेष्ठ शब्द आहे महाराज ! प्रत्येक वारकरी एकमेकांशी बोलताना माऊली म्हणतो. म्हणजे तो समोरच्यात विठ्ठल पहातो. तुम्ही देखील लवांडेंवर शाईच्या दोनतीन मोठ्या बाटल्या रिचवन्यापूर्वी त्यांना माऊली म्हणाला असता तर बरे झाले असते. प्रथा पाळली गेली असती. पण तुमचा अभिनिवेश, भाषा इतकी थोर होती की आपण भक्ती संप्रदायात फार मोठी क्रांती घडवून आणतोय, धोक्यात आलेला संप्रदाय वाचवतोय असेच काहीसे वाटत होते. आपण जी ही हिंदू धर्म वाचवण्याची 'क्रांती' करतोय तिचे चित्रीकरण देखील हा इतिहास कायम रहावा म्हणून तुम्ही केले, हे बरे केले.
आपली माऊली एकच. म्हणजे #विठोबारुखमाई. पण आपण एकमेकांना #माऊली म्हणणे, याचा अर्थ आपला भागवत धर्म किती सहिष्णू आहे हेच दिसते ना ! प्रेम आणि सहिष्णुता हा त्याचा गाभा आहे. तोच धर्म आहे. वारकरी हाच धर्म आहे. तुम्ही तर तो अधर्म करून दाखवला. अर्थात तुम्ही केले म्हणजे झाले असे नसते होत. या संप्रदायावर कधी आत घुसून कधी बाहेरून असे अनेक हल्ले आजवर झालेत, होत आहेत, होतील. पण जोवर संतांचे अभंग जिवंत आहेत तोवर वारकरी या शब्दाला कोणीही मारू शकणार नाही भंडारे.
-तू माझी माऊली, मी वो तुझा कान्हा। देई प्रेमपान्हा, पांडुरंगे ।
किती श्रेष्ठ आहे हो आपला भागवत धर्म !
*चोखा, *बंका, *नामा, *जना, *सेना, *सावता, *सजन कसाई, *कर्ममेळा किती नावे घेणार ?
अहो, त्या काळात दीडशेवर मराठी सुफी संत झालेले. जातीने मुसलमान असलेले. त्यांचा आणि तुमच्या तथाकथित हिंदुत्ववादी विचारांचा काहीही संबंध नव्हता. मानवता धर्म म्हणूनच ते भागवत धर्माकडे पहात होते. मग हा आपला भागवत धर्म म्हणजे केवळ मानवता धर्म, हिंदुत्ववादी कधीपासून झाला ? जो मुळात तसा नाहीच आहे, त्याला सनातनी रुप देण्याचा अट्टाहास कोणी केला ? कोण करतंय ? त्याची कारणे काय आहेत ? हे न समजण्याऐवढे अज्ञान या देशात पसरले आहे असे आपल्याला वाटते का ?
ज्यांना ज्ञानोबा तुकोबा नाथ नको होते त्यांनी क्रमाक्रमाने हा धर्म बाटवायला सुरवात केली. त्याला ब्राह्मणी धर्मशरण करायला सुरुवात केली. वैदिकांचे #ब्राम्हणत्व #नाकारून हा धर्म उदयाला आला होता, त्याचे पुन्हा ब्राम्हणिकरण करायला सुरुवात झाली. ती केली ती या संप्रदायात घुसलेल्या #सनातनी #ब्राम्हणी लोकांनी. ज्यांना आपण आपले गुरू मानता. त्यांना आदर्श मानून लवांडेनवर शाई फेकता. कोणाची वाट अडवून त्रास देणे हा सुद्धा भा.द.वी. नुसार #दखलपात्र गुन्हा ठरतो. तुमच्यावर कदाचित तो दाखल होणार नाही. कारण ज्यांच्या विचारांची ओझी तुम्ही वहाता तेच सत्तेवर आहेत. त्यांची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी तुमच्यासारखे अनेक लोक पाळणे, त्यांना गरजेचे आहे. त्यांच्या गरजा तुम्ही पूर्ण करता, आणी तुमच्या "ते. मग इकडे शेकडो वर्षांची वैष्णव परंपरा नष्ट झाली तरी हरकत नाही. देशाचे >> सर्वोच्च न्यायमूर्तीच जेंव्हा छत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरचे सहकुटुंब दर्शन घेतात, स्वतःला आंबेडकरवादी म्हणवत << तेव्हा कोणावर विश्वास ठेवणार ?
#विनोबा तुम्हाला ठाऊक आहेत का ? भगवद्गीता ज्यांनी मराठीत आणली. तिला 'गीताई' म्हणतात. 'खाली शाखा वरी मूळ, नित्य अस्वस्थ बोलिला... '
तर #विनोबा म्हणतात, 'जगातला एकमेव अहिंसक देव हा विठोबा आहे. त्याच्या हातात शस्त्रे नाहीत.'
आता हिंसा म्हणजे काय महाराज ? आपल्या शब्दाने किंवा कृतीने कोणाला दुखावणे. हे गांधीजी प्रणित तत्वज्ञान आहे. तुम्ही तर जाहीरपणे गोडसेभक्त आहात. ज्या गोडसेने गांधीजीना गोळ्या घातल्या. तुम्हाला सांगतो माऊली, या हल्ल्यातून समजा बापूजी बचावले असते तरी त्यांनी गोडसेला क्षमा केली असती. त्यांना महत्तम तथागत गौतम बुद्ध, तुकोबा कळला होता.
म्हणजे एकाच वेळी गोडसे भक्त असणे आणि हरिभक्तपरायण असणे हे तुम्ही कसे साध्य केले. तुकोबा म्हणतात तसे, प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे, असे काहीसे ते आहे का ?
-मुळात #ब्राह्मण्यवादी असायला "ब्राम्हण असणे महत्त्वाचे नाही, हे 'अलीकडच्या स्वातंत्र्य काळात' बरेच लोक सिद्ध करत आहेत. त्यातले आपण एक आहात. जातीने ब्राम्हण असूनही ब्राह्मण्यवादी नसणारे अनेक लोक मी सांगू शकेन, ज्यांचे डोके अजून आपल्याच डोक्यावर आहे.
>तुम्ही राजकारण करणारे आहात. तुम्हाला सांगतो मध्ययुगात सगळ्यात मोठे राजकारण *मराठी संतांनी* केले होते. त्यांनी बहुजनवादी राजकारणाचा पाया घातला होता. छत्रपती कोण होते ? 'शिवाजी कोण होता'.. या शिर्षकावरून छत्रपतींना समजून न घेता - #हैदोस घालणारा हा काळ कोणी पैदा केला ? तुम्ही खूप 'मायेने' जे लोक हिरवे साप, मुसलमानी लोकांवर बहिष्कार घाला - अशी भाषा करतात, त्यांची नावे आपले आदर्श म्हणून भाषणात घेता. जो #भिडे महात्मा फुल्यांना "देशद्रोही म्हणतो, जे #राज्यपाल रामदास अगर ना होते तो शिवाजीमहाराज को कौन पहचानता, अशी भाषा वापरतात, जो #कोरटकर राजांचा अवमान करतो, जो #सोलापूरकर महाराजांनी लाच दिली म्हणतो, जो पेशव्यांनी महाराष्ट्र घडवला, शिवाजी महाराजांनी केवळ छापेमारी केली असे म्हणतो, तो #बागेश्वर राजांनी आपला मुकूट राज्य रामदासाच्या चरणी अर्पण केले असे म्हणतो - तेव्हा या तथाकथित हिंदभूमीवरच्या पटलावरले शाईचे कारखाने बंद पडले होते काहो ?
अहो *जोतिबा फुले नसते तर तुम्हाला अक्षरओळख सुद्धा नसती झाली. बाबासाहेब नसते *संविधान हा शब्दही नसता कळला, ज्यामुळे अभिव्यक्ती म्हणून तुम्ही काहीही बरळत असता. *गांधी *नेहरू *सरदार *भगतसिंग वगैरे थोर नसते तर ? त्यांना शिव्या देण्याचे स्वातंत्र्य नसते तुम्हाला मिळाले संग्रामजी.
-खूप बोलता येईल माऊली (?). मराठी संतांनी केलेले समाजशील राजकारण आणि संस्कृती, समाजकारण शक्य असेल तर थोडे 'अ-निलेश', शुद्ध माणूस होऊन समजून घ्या. वाटल्यास मला फोन करा, मी पुस्तके सुचविल.
हे पत्र समजा तुमच्या वाचनात आलेच, तर माझ्याकडे या, मी तुम्हाला काळी, हिरवी, निळी शाई पुरवेन, माझ्यावर टाकायला. आपल्याकडे पिस्तुल असेल तर तेही जरूर आणा. आपल्याकडे पिस्तुलेबाबा देखील आता तयार व्हायला लागलेत. ज्ञानोबांच्या पादुकांचे अमिश दाखवून कोट्यावधीने *बहुजनांना लुटणारे. त्यात आपण एक. फरक काय पडतो. आपण माझ्यावर किंवा माझ्यासारख्या अनेकांवर शाईहल्ला करायला आलात, तर मला खूप आनंद वाटेल.
वाट बघतो.
आपलाच,
अ-हभप श्रीकांत देशमुख, नांदेड.
0 टिप्पण्या