२ मे २०२६ पासून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे “महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनी २०२६”चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १४ मेपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे. यंदाच्या प्रदर्शनात एकूण ५०० स्टॉल्स उभारण्यात आले असून, त्यात महाराष्ट्रातील २३०, इतर राज्यांतील ६६, नाविन्यपूर्ण महिला गटांचे ६८ आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (FPO) ३४ स्टॉल्स समाविष्ट आहेत. याशिवाय NABARD, MAVIM, खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई महानगरपालिका आणि इतर शासकीय संस्थांचे २२ स्टॉल्सही सहभागी झाले आहेत. प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ८० स्टॉल्सचा वातानुकूलित फूड कोर्ट, जिथे विविध पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच हातमागाची वस्त्रे, वारली व बंजारा कला, लाकडी खेळणी, दागिने आणि विविध ग्रामीण उत्पादने खरेदीची संधी नागरिकांना मिळणार आहे. यंदा एआर फोटोग्राफी, अॅनामॉर्फिक वॉल आणि इन्फोग्राफिक वॉलसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गर्भवती महिलांसाठी विशेष सुविधा तसेच २५ किलोमीटरपर्यंत मोफत होम डिलिव्हरीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हा उपक्रम महिलांना आत्मनिर्भरता, नेतृत्व आणि सामाजिक ओळख देणारा व्यापक जनआंदोलन बनला आहे. ग्रामीण महिलांना संघटित करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. या अभियानातून आतापर्यंत महिलांना १०,००० कोटी रुपयांहून अधिक कर्जवाटप करण्यात आले असून, केवळ मागील वर्षातच इतक्याच रकमेचे कर्ज महिला उद्योजिकांना देण्यात आले आहे महाराष्ट्रात महिलांच्या सशक्तीकरणाचे प्रभावी प्रतीक ठरलेला “महालक्ष्मी सरस” उपक्रम यंदाही भव्य स्वरूपात साकारत आहे. राज्यात ५० लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’ कार्यरत असून, त्या उद्योजकतेसोबतच रोजगारनिर्मितीतही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एकंदरीत, “महालक्ष्मी सरस २०२६” हे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारे आणि ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. अशी माहिती उमेद चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर (आयएएस) व निखिल ओसवाल यांनी प्रेस क्लब मध्ये बोलताना दिली.
0 टिप्पण्या