बुधवार दिनांक १३-०५-२०२६ रोजी हडपसर येथिल रुग्णालयात मिळून आलेल्या बॉम्बसंबंधीची माहिती पोलीसांच्या हवाल्याने सतत २-३ दिवस स्थानिक वर्तमानपत्रांत प्रसिध्द होत होती.
दि. १३-०५-२०२६
१. हडपसर भागातील उषा किरण रुग्णालयातील स्वच्छतागृहात सायं. ७.३० चे दरम्यान टायमर बॉम्ब सदृश वस्तू मिळून आली.
२. पोलीसांच्या बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाने घटनास्थळी पोहोचून संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली.
३. प्रथमदर्शनी या वस्तूमध्ये जिलेटीनच्या कांड्या आणि डिजिटल घड्याळ असल्याचे आढळून आले.
४. बीडीडीएसने संबंधीत वस्तू ग्लाईडिंग सेंटरच्या मोकळया जागेत नेली व नियंत्रित स्फोट करून ती निकामी केली.
५. स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा व दहशतवादी विरोधी पथक (एटीएस्) यांचेकडून संयुक्त तपास सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
६. हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत. त्यावरून संशयित बॉम्ब दिसून येण्याच्या काही वेळा पूर्वी हॉस्पिटलमध्ये आला होता असे दिसून येते.
दि. १४-०५-२०२६
१. उषाकिरण रुग्णालयात सापडलेली वस्तू ही केवळ बॉम्ब सदृश नसून तो खरोखरचाच बॉम्ब (आय्ईडी) असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
२. त्या आय्ईडी मध्ये जिलेटिन, टायमर, डिटोनेटर, वायर, अल्युमिनियम कव्हर, सेन्सर हे घटक होते.
३. आय्ईडी अत्यंत सराईतपणे बनविल्याचे तपासात समोर आले. यामागे प्रशिक्षित व स्फोटकांसंबंधी माहिती असलेल्या व्यक्तिचा हात असण्याची शक्यता पोलीसांकडून व्यक्त करण्यात आली.
४. बॉम्बमध्ये स्फोटाची वेळ मध्यरात्री सेट करण्यात आली होती.
५. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरील अ.क्र. १ ते ४ ची माहिती पत्रकारांना दिली.
६. हडपसर पो.स्टे. मध्ये बी.एन.एस. चे कलम १०९ (खूनाचा प्रयत्न), १२५ (निष्काळजी व हयगयीचे कृत्य) व २८८ (स्फोटक पदार्थाने निष्काळजी कृत्य) याखाली गुन्हा दाखल केला.
दि. १५-०५-२०२६
१. पोलीसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने व संशयिताने चिकटपट्टी खरेदी करताना आपल्या मोबाईलवरून ऑन-लाईन पेमेंट केल्यामुळे प्राप्त झालेल्या मोबाईल फोन नंबरवरून संशयिताला नागपूर रेल्वे परिसरात अटक केली.
२. त्याचे नाव शिवाजी रामा राठोड (वय २९, रा. मांजरी, पुणे, मूळगांव कवठे, सोलापूर) असे आहे.
३. तो तीन महिन्यांपासून मांजरी येथे कपडे व चप्पल विक्रीचे दुकान चालवित होता. त्याचा व्यवसाय नीट चालत नव्हता.
४. हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्यानंतर तो हावडा एक्सप्रेसने नागपूरमार्गे नेपाळला पळून जात होता.
५. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी शिवाजी राठोड दहा मे रोजी रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. तेथे उपचाराचा खर्च जास्त सांगितल्याने त्याने रुग्णालयाकडून आठ लाखाची खंडणी उकळण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने सोशल मिडियाच्या मदतीने डिजिटल घड्याळ, चार पाईप, चिकटपट्टी आणि लाल-काळ्या वायरचा वापर करून अवघ्या चारशे रुपयात *बनावट बॉम्ब तयार केला. त्यात स्फोटक पदार्थ नव्हते, हे दहशतवादी कृत्य नाही,... वगैरे.
वरील माहितीवरून असे स्पष्ट दिसून येते की, आरोपी अटक होईपर्यंत स्थानिक पोलीस व एटीएस हे योग्य प्रकारे तपास करीत होते. पण आरोपीला अटक होताच कोठून तरी सूत्रे हलली व गुन्ह्याचे चित्रच बदलले. खऱ्या बॉम्बचा बनावट बॉम्ब झाला व दहशतवादी कृत्याचे रूपांतर खंडणी प्रकरणात झाले.
नंतरची ही स्टोरी खोटी आहे हे दाखविणे सहज शक्य आहे. पोलीस आयुक्त १४ मे रोजी ती वस्तू कमी शक्तीचा बॉम्ब आहे व त्यात जिलेटीनच्या कांड्या व डिटोनेटर आहे असे सांगतात व दुसऱ्या दिवशी त्यात स्फोटके नव्हती व तो बनावट बॉम्ब होता असे सांगतात. जिलेटीन कांड्या ही स्फोटकेच आहेत हे जर पोलीस आयुक्तांना माहित नसेल तर हे पुण्याच्या जनतेचे दुर्देव आहे. तसेच तो जर बनावट बॉम्ब असता तर प्रथम दर्शनीच बीडीडीएसच्या ते निदर्शनास आले असते व त्यांना नियंत्रित स्फोट करून तो बॉम्ब निकामी करण्याची आवश्यकताच नव्हती. दुसरी बाब म्हणजे आरोपीने हे कृत्य हॉस्पिटल मॅनेजमेंटकडून खंडणी उकळण्यासाठी केले असते तर त्याने बॉम्ब ठेवण्यापूर्वीच पैशाची मागणी केली असती. एकदा बॉम्ब ठेवल्यानंतर तो खंडणीसाठी काय भीती दाखविणार होताॽ तसे त्याला करायचेच होते तर त्याने पुण्यात थांबणे आवश्यक होते. तो नेपाळला का पळून चालला होताॽ
एकंदरीत प्रकरणावरून असे दिसून येते की, आरोपीचे हे कृत्य दहशतवादी कृत्यच होते. तो अटक होईपर्यंत कोणी पोलीसांच्या तपासात हस्तक्षेप केला नाही. पण तो अटक होताच सूत्रे हलू लागली. यावरून तो एखाद्या ब्राह्मण्यवादी संघटनेशी संबंधीत असावा व त्याला वाचविण्यासाठी गुप्तचर यंत्रणा व शासनाने पोलीस आयुक्तांवर दबाव आणला असावा असे स्पष्ट दिसून येते. अशी शंका व्यक्त करण्याचे कारण म्हणजे पुणे येथे गेल्या १५-१६ वर्षांत झालेल्या महत्वाच्या बॉम्बस्फोटांमध्ये संशयाची सुई ब्राह्मण्यवाद्यांकडे जात असताना गुप्तचर यंत्रणा व एटीएस यांनी त्यांना वाचविले होते व निरपराध मुस्लिमांना अटक केली होती.
उदा. १) जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट : दि. १३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्याच्या जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी स्फोट करण्यासाठी वापरलेल्या मोबाईल फोनचे सीम-कार्ड मिळाले असताना एटीएसने त्याचा तपास न करता फोनच्या मागील कव्हरचा तपास केला. व हिमायत बेग या निरपराध तरूणाला अटक केली. सीम कार्डचा तपास केला असता तर खरा आरोपी सारंग कुलकर्णी मिळाला असता व ते त्यांना नको होते. तसेच मडगांव (गोवा) येथिल स्फोटाच्या तपासात जर्मन बेकरी स्फोट सारंग कुलकर्णी व पुण्याच्या शिवाजीनगरच्या एका जातीयवादी अतिरेक्याचा हात असल्याचे स्पष्ट झाले असताना त्यांना अटक केली नाही. चूकीने अटक केलेल्या हिमायत बेगची पुढे हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली.
२) जंगली महाराज रोड साखळी स्फोट : दि. १ ऑगस्ट २०१२ रोजी जंगली महाराज रोडवर ३ ठिकाणी स्फोट झाले. त्याच वेळी पिशवीतून बॉम्ब घेऊन जाणाऱ्या दयानंद पाटीलला पोलीसांनी अटक केली. पण तो पतीत पावन नावाच्या ब्राह्मण्यवादी संघटनेशी संबंधीत असल्याचे दिसून आल्यामुळे त्याला साक्षीदार बनविला व आठ निरपराध मुस्लिमांना अटक करून त्यांचेविरूध्द चार्जशीट पाठविले. स्फोट झालेल्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज पोलीसांनी मिळविले होते, पण ते त्यांनी चार्जशीट सोबत पाठविले नाहीत, कारण त्यांना माहित होते की, त्यामध्ये अटक आरोपी दिसणार नाहीत, खरे ब्राह्मण्यवादी आरोपी दिसतील व ते त्यांना नको होते.
३) दगडूशेठ गणपती (फरासखाना पो.स्टे.) स्फोट : दि. १० जुलै २०१४ रोजी दगडूशेठ गणपती मंदीराच्या शेजारी असणाऱ्या फरासखाना पो.स्टे.च्या पार्किंग लॉट मध्ये एक मध्यम शक्तीचा स्फोट होऊन त्यात ५ लोक जखमी झाले व ६ मोटार सायकलचे नुकसान झाले. तपासामध्ये धारवाड (कर्नाटक) येथिल शिवराज कुलकर्णी या ब्राह्मण्यवाद्याचे नाव निष्पन्न झाले. पण पोलीसांनी त्याला वाचविण्यासाठी हा स्फोट मध्यप्रदेशमधील ५ मुस्लिमांनी केले असा बनाव केला. त्या ५ तरूणांविरूध्द कोणताही पुरावा नसताना व त्यांना गुन्ह्यात अटक केली नसतानाही गुप्तचर यंत्रणेच्या मार्फत त्यांचे एन्काउंटर केले व सर्व आरोपी मेले असा कोर्टाला अहवाल पाठवून कोर्टाला तपास बंद करण्याचा आदेश देणेस विनंती केली. कोर्टानेही कोणताही विचार न करता तो आदेश दिला व तपास बंद झाला.
वरील तिन्ही बॉम्बस्फोट प्रकरणांचा उहापोह मी माझ्या Brahminists Bombed, Muslims Hanged (मराठी भाषांतर : बॉम्बस्फोट : ब्राह्मण्यवादी दोषी, मुस्लिमांना फाशी) या पुस्तकात केला आहे. पुस्तक २०१९ मध्ये प्रथम प्रसिध्द झाले, पण अद्यापही त्याचा कोणी प्रतिवाद केला नाही.
हडपसरच्या उषाकिरण हॉस्पिटलमध्ये ठेवलेला बॉम्ब वेळीच मिळाला नसता व ठरल्याप्रमाणे मध्यरात्री स्फोट झाला असता तर गुप्तचर यंत्रणा व एटीएस ने अनेक निरपराध मुस्लिमांना अटक केली असती व खोटा तपास करून त्यांचेविरूध्द दोषारोपपत्र पाठविले असते. खरा आरोपी मिळून आला असता तरी त्याला क्लीन चिट दिली असती व त्याला फार तर साक्षीदार केले असते. पण हॉस्पिटल स्टाफच्या सतर्कतेमुळे हा बॉम्बस्फोट टळला व आरोपीही मिळाला. पोलीसांनी आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड ही घेतली आहे. पण पोलीस आयुक्त यांनी आधीच त्याला क्लीन चिट दिली असल्यामुळे पोलीस कस्टडी हा फक्त दिखावा आहे हे स्पष्ट होते. तरी पोलीसांनी जनतेची दिशाभूल न करता आरोपीची कसून चौकशी करावी व तो कोणत्या अतिरेकी संघटनेशी संबंधीत आहे, त्याने बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण कोठे घेतले हाते, त्याचे साथीदार कोण कोण आहेत वगैरे माहिती मिळवावी.- एस्.एम्. मुश्रीफ, माजी पोलीस महानिरीक्षक.. पुणे (दि. २०/०५/२०२६)
0 टिप्पण्या