: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे राज्यभर बुवाबाजी विरोधी अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत विविध शहरांमध्ये जनजागृतीपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. समितीचे संस्थापक व राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांचे “बुवा तेथे बाया, खरात सारख्या बाबांना स्त्रिया का बळी पडतात?” या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील हा कार्यक्रम मंगळवार, 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजता राजर्षी शाहू महाराज सभागृह येथे होणार आहे. या कार्यक्रमास माजी पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर, ‘चित्रलेखा’चे माजी संपादक ज्ञानेश महाराव तसेच समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रविंद्र खानविलकर, राष्ट्रीय महासचिव हरीष देशमुख, राज्य संघटक हरीभाऊ पाथोडे, राज्य सचिव प्रशांत सपाटे, राज्य महिला संघटक छाया सावरकर आदी पदाधिकारी अभियानात सक्रिय सहभागी आहेत. अभियानाची सुरुवात 18 एप्रिल रोजी अकोला येथून झाली असून बुलढाणा, नाशिक, नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, कीर्तनकार विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक घटनेचा समितीतर्फे निषेध करण्यात आला आहे. समितीचे मुंबई संघटक चंद्रकांत सर्वगौड यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, “आमचा देवा-धर्माला विरोध नाही. देवा-धर्माच्या नावावर सामान्य जनतेचे शोषण करणाऱ्या व लुबाडणाऱ्यांविरुद्ध हा लढा आहे.” समाजातील अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि मानवतावादी समाज निर्माण करणे हा समितीचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते Shyam Manav यांनी महाराष्ट्रातील वाढत्या अंधश्रद्धा, भोंदू बाबा आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा २०१३ मध्ये लागू झाला असला तरी त्याचा प्रभावी प्रचार आणि अंमलबजावणी अनेक ठिकाणी होत नाही.
श्याम मानव यांनी आरोप केला की, समाजातील अंधश्रद्धेचा फायदा घेत काही भोंदू बाबा महिलांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करत आहेत. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून हे प्रकार घडत असल्याचे त्यांनी म्हटले. “वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया” या आचार्य अत्रे यांच्या विधानाचा उल्लेख करत त्यांनी समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले.
त्यांनी सांगितले की, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राज्यभर पोलीस अधिकारी, पत्रकार, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. मात्र, पुढील काळात अनेक उपक्रम थांबले. जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार-प्रसार आणि अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी, यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
भोंदूगिरीच्या घटनांमध्ये महिलांचे शोषण होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच समाजाने अंधश्रद्धेपेक्षा विज्ञान आणि तर्कशुद्ध विचारांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन श्याम मानव यांनी केले.
तसेच त्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेचा उल्लेख करत, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांच्या विचारांमधून समाजप्रबोधनाचा संदेश दिला. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी शासन, पोलीस यंत्रणा आणि सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

0 टिप्पण्या