Top Post Ad

मिठी नदी, नाले आणि रेल्‍वे कल्वर्टच्‍या स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्याचे निर्देश

मिठी नदी तसेच मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे युद्धपातळीवर हाती घेऊन ती निर्धारित मुदतीत पूर्ण करावीत. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची नियुक्ती करावी. पावसाचे पाणी लोकवस्तीत घुसू नये यासाठी सखल भागांमध्ये नाल्यांना संरक्षक सीमाभिंती उभाराव्यात.  नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अखंड आणि सुरळीत राहील, प्रवाह अरुंद होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. नाल्यांच्या वहन क्षमतेस अडथळा निर्माण करणाऱया उपयोगिता वाहिन्यांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले. रेल्वे हद्दीतील सर्व मोऱ्या (Culverts) आणि जलनिस्सारण मार्गांची पावसाळ्यापूर्वी संपूर्ण स्वच्छता करून पाण्याचा निचरा सुरळीत राहील, याची खात्री करावी. मुंबई महानगर पूरमुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने रेल्‍वे, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) यांच्‍यासमवेत इतर सर्व प्राधिकरणांशी प्रभावी समन्‍वय साधावा, असेदेखील निर्देश  शिंदे यांनी दिले.

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून  महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत.  पूर्व उपनगरांतील मिठी नदी, रेल्वे कल्वर्ट आणि नाल्यांमधील गाळ उपसा कामांची स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍थायी समिती सदस्‍यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. 

महानगरपालिकेचे सभागृह नेते तथा स्‍थायी समिती सदस्‍य गणेश खणकर, कॉँग्रेस पक्षाचे गटनेते तथा स्‍थायी समिती सदस्‍य अशरफ आझमी, स्‍थायी समिती सदस्‍य तथा नगरसेविका प्रिती सातम, स्‍थायी समिती सदस्‍य तथा नगरसेविका दीपमाला बढे, स्‍थायी समिती सदस्‍य तथा नगरसेवक जमीर कुरेशी, एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका आशा मराठे, नगरसेविका कशिश फुलवरिया, नगरसेविका मिनाक्षी पाटणकर, एल विभागाचे सहायक आयुक्त  धनाजी हेर्लेकर, एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त  शंकर भोसले,  प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या)  एस. डी. पांडव, उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (पूर्व उपनगरे)  संजय इंगळे यांच्यासह मध्य रेल्वेचे अधिकारी, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.

 पूर्व उपनगरातील कुर्ला (पूर्व) येथील मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे कल्वर्ट, वांद्रे कुर्ला संकुल येथील वांद्रे कुर्ला संकुल कनेक्टर येथील मिठी नदी, शेल वसाहत मार्गावरील टिळक नगर - चेंबूर रेल्वे स्थानक कल्वर्ट, गोवंडी व चेंबूर रेल्वे स्थानक येथील सुभाष नगर नाला, मानखुर्द व गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यानचा डेमोग्राफिक नाला, मानखुर्द व गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यानचा टेलिकॉम नाला आणि मानखुर्द व गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यानचा मानखुर्द नाला आदींची स्‍थायी समिती अध्‍यक्ष श्री. प्रभाकर शिंदे व स्‍थायी समिती सदस्‍यांनी पाहणी केली. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले. 

प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना  प्रभाकर शिंदे यांनी सांगितले की, मिठी नदीतील गाळ मोठ्या प्रमाणात काढणे हाच पूरस्थिती टाळण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. यासाठी यंत्रसामग्रीची संख्या वाढवून कामांना गती देणे आवश्यक आहे. नाल्‍यातील तरंगता कचरा हटविणे आणि नाल्‍यांची खोली वाढविण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. सर्व कामे दिनांक ३ जून २०२६ पूर्वी पूर्ण करावीत. तसेच, अधिकाधिक यंत्रसामग्री, मनुष्‍यबळ कार्यरत ठेवून कामे वेगाने पूर्ण करावीत. रेल्वे कल्वर्टलगतची सीमाभिंत उंचावण्याबाबत संबंधितांना निर्देश दिल्‍याचे  शिंदे यांनी नमूद केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com