शासकीय धान्य गोदामांमध्ये माथाडी कामगारांची कामे ही कंत्राटी कामगारांना देण्याचे प्रयत्न शासनाने सुरू केलेले आहेत. या विरोधात राज्यभरातील १० हजार माथाडी कामगार आक्रमक झाले असून या कामगारांनी आजही शासनाच्या विरोधात तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या राज्यभरातील तहसील कार्यालयांसमोर जोरदार धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र सुरक्षा सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. माथाडी कामगार एकजुटीचा विजय असो, आमची रोजीरोटी हक्काची- नाही कोणाच्या बापाची, कंत्राटी पद्धत बंद करा-बंद करा, माथाडी कामगारांसमोरचे संकट दूर करा-दूर करा, अशा घोषणा देत राज्यभरातील २५० हून अधिक तहसील कार्यालये आणि तालुकास्तरीय गोदामांसमोर माथाडी कामगारांनी आज धरणे आंदोलन केले. काल ठाणे, पालघर, रायगड-अलिबागसह संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर याच प्रश्नावर माथाडी कामगारांनी जोरदार आंदोलन करून शासनाचा निषेध केला.
आज झालेल्या धरणे आंदोलनात दिवंगत डाॅ. बाबा आढाव यांची महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी मंडळ, अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक आणि आणि जनरल कामगार युनियन, नरेंद्र पाटील यांची महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन आदी संघटनांचे माथाडी कामगार आणि पदाधिकारी ठिकठिकाणी झालेल्या या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. असे भारतीय माथाडी सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अरुण रांजणे यांनी सांगितले.माथाडी मंडळातील भरती बाबतची जाहिरात आणि शासकीय धान्य गोदामांमधील हक्काची कामे मिळवण्यात नोंदणीकृत माथाडी कामगारांना येणाऱ्या अडचणींबाबत आज माथाडी व सुरक्षारक्षक कायदा बचाव कृती समितीची बैठक या समितीचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत कर्नाक बंदर येथील पी. डीमेलो भवन येथे पार पडली. माथाडी कामगारांवर बेकारी आणू नये. सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका या बैठकीत नरेंद्र पाटील यांनी मांडली. या बैठकीस डॉ. बाबा आढाव यांच्या संघटनेचे अध्यक्ष राजकुमार घायाळ, उपाध्यक्ष सुभाष लोमटे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे निवृत्ती धुमाळ, भारतीय माथाडी सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष राजन म्हात्रे, सरचिटणीस अरुण रांजणे, महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे नेते बळवंतराव पवार, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
शासकीय धान्य गोदामांमधील माथाडी कामगारांच्या रोजगाराबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.या कामगारांना बेरोजगार करण्याचा सरकारचा हेतू नाही,असे आश्वासन ग्राहक नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज मंत्रालयात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार कृती समितीच्या बैठकीत बोलताना दिले.या बैठकीस या समितीचे अध्यक्ष नरेंद्र पाटील , काॅग्रेस नेते हुसेन दलवाई, डाॅ.बाबा आढाव यांच्या युनियनचे राजकुमार घायाळ,सुभाष लोमटे,ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे निवृत्ती धुमाळ,भारतीय माथाडी सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष राजन म्हात्रे आदी उपस्थित होते. शासकीय धान्य गोदामांमध्ये कंत्राटी कामे करुन घेण्याच्या निर्णयास स्थगिती आहे.कोर्टाचा निर्णय याबाबत आल्यावर माथाडी कामगारांच्या रोजगाराबाबत सकारात्मक निर्णय घेता येईल असेही भुजबळ यांनी या समितीस आश्वासन दिले आहे. दरम्यान शासनाने आज सकारात्मक आश्वासन दिले आहे.यामुळे शासकीय धान्य गोदामांमधील माथाडी कामगारांनी आपले आंदोलन तूर्त थांबवण्याचा निर्णय घेतला आहे असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

0 टिप्पण्या