Top Post Ad

भाजपची ४५ वर्षांची वाटचाल : गांधीवादी समाजवाद ते (बेगडी) हिंदुत्व!

 सत्तेने मदमस्त झालेल्या एकछत्री राजवटीचा अंमल धुडकावून लावीत लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी मोठ्या मेहनतीने, अथक परिश्रमाने संघटना कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल या विविध विचारप्रणालींच्या चार पक्षांची मोट बांधून जनता पक्ष स्थापन केला. स्वतः पंतप्रधान होण्याऐवजी मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार स्थापन केले. परंतु राजनारायण, मधु लिमये आदी समाजवाद्यांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आदींवर दुहेरी निष्ठेचा (हे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जातात असा) नाहक सवाल उभा करीत जनता पक्ष फोडण्यासाठी प्रवृत्त केले. अखेर पूर्वाश्रमीच्या भारतीय जनसंघ मधील नेत्यांनी 'भारतीय' शब्द तसाच ठेवून लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या पुण्याईचा पुरेपूर फायदा उठविण्यासाठी त्यांच्याच प्रेरणेने स्थापन झालेल्या 'जनता पक्षा' मधून फुटून बाहेर पडत 'भारतीय जनता पक्ष' मुंबई येथे महाअधिवेशन भरवून ६ एप्रिल १९८० रोजी स्थापन केला. 

मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेच्या या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या आग्रहाखातर नामंजूर करण्यात आलेला 'गांधीवादी समाजवाद' स्वीकारला. जर आपल्याला भारतीय राजकारणात टिकायचे असेल तर गांधीवादी समाजवाद हा सिद्धांत स्वीकारण्याशिवाय तरणोपाय नाही, त्याशिवाय पर्याय नाही, असे अटलबिहारी वाजपेयी यांनी ठणकावून सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला तोच मुळी धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या पायावर आधारित आहे. त्यामुळे ९५ विरुद्ध ५ अशा प्रचंड बहुमताने फेटाळण्यात आलेले 'गांधीवादी समाजवाद' हे तत्त्व केवळ अटलबिहारी वाजपेयी यांच्या हट्टाग्रहाने भारतीय जनता पक्षाने स्वीकारले. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयाराजे शिंदे अशा असंख्य महानुभावांनी जे श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचे पाईक होते त्यांनी भारतीय जनता पक्ष पुढे नेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी संसदेच्या सभागृहात आवर्जून बसून रहात ते जाज्वल्य विचारांचे अटलबिहारी वाजपेयी हे खरोखरीच थोर संसदपटू होते. 

भारतीय संसदेत बॅरिस्टर नाथ पै आणि अटलबिहारी वाजपेयी ही जोडी गाजली होती. वाजपेयी, आडवाणी, मुरली मनोहर जोशी आदींनी भारतीय जनता पक्ष वाढवला, फुलवला तो एका तत्वाने, विचाराने, सिद्धांताने, प्रामाणिकपणे. त्यामुळे तत्कालीन भारतीय जनता पक्ष हा लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागला. १९८० साली स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाने ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कॉंग्रेसला तब्बल ४०४ जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले. डॉ. ए. के. पटेल आणि चंदुपातला जंगा रेड्डी यांनी काँग्रेसच्या लाटेतही भाजपला विजय मिळवून दिला. गुजरातमधील मेहसाणा मतदारसंघातून पटेल विजयी झाले, तर चंदुपातला जंगा रेड्डी आंध्र प्रदेशातील हनमकोंडा मतदारसंघातून खासदार झाले. अटलबिहारी वाजपेयी हे स्थापनेपासून सुमारे सहा वर्षे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. लोकनेते असा नावलौकिक असलेले श्री. अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्धतेसाठी ओळखले जात. १३ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारली. 

१९९६ साली थोड्या कालावधीसाठी त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिले होते. पंडित नेहरुनंतर सलग दुसऱ्यांदा जनादेश मिळवून पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान त्यावेळी ठरले होते. ज्येष्ठ संसदपटू असलेले अटल बिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते. श्री. अटल बिहारी वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते हाही एक प्रकारचा विक्रमच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक जबाबदार विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली. १९४२ मधील भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थीदशेतच वाजपेयी यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले. राज्यशास्त्र व कायद्याचे विद्यार्थी असलेल्या श्री. अटलबिहारी वाजपेयी यांना शालेय काळातच परकीय व्यवहारामध्ये रुची निर्माण झाली होती. त्यांनी ही आवड पुढे अनेक वर्ष जोपासली व विविध द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी या कौशल्याचा उपयोग केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली 

परंतु अल्पावधीतच म्हणजेच १९५१ साली भारतीय जनसंघात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडली. १९५२ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघ स्थापन केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्वाचा घटक असलेला भारतीय जनता पक्ष हा जनता पक्षात येण्याआधी भारतीय जनसंघ म्हणून ओळखला जात होता. समीक्षकांकडून प्रशंसा मिळविलेले श्री. अटलबिहारी वाजपेयी एक ख्यातनाम कवी म्हणून ओळखले जात. शिवाय आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून ते संगीत व पाक कलेतही विशेष रस घेत.

२५ डिसेंबर १९२४ रोजी तत्कालीन ग्वालियर/ग्वाल्हेर संस्थानातील (आता मध्यप्रदेश) एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात श्री. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे. उदारमतवादी जागतिक दृष्टीकोन व लोकशाही तत्त्वांशी असलेली बांधिलकी यामुळे जनसामान्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो. महिला सबलीकरण व सामाजिक समानतेचे खंबीर समर्थक असलेले श्री. अटल बिहारी वाजपेयी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये एक दूरदर्शी, विकसित आणि मजबूत राष्ट्र म्हणून बघू इच्छित. ५ हजार वर्षांची ऐतिहासिक संस्कृती लाभलेल्या व आगामी एक हजार वर्षांमध्ये येणारी आव्हाने पेलण्यास तयार असलेल्या भारताचे ते प्रतिनिधित्व करीत.

भारताप्रती असलेले त्यांचे निःस्वार्थ समर्पण व पन्नास वर्षाहून अधिक काळ देशासाठी दिलेल्या निःस्पृह सेवेबद्दल त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९९४ साली उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. एका उल्लेखानुसार, अटल बिहारी वाजपेयी नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. जनसामान्यांच्या आशा आकांक्षा श्री. वाजपेयी यांनी पूर्ण केल्या. त्यांच्या कार्यातून आजही त्यांची राष्ट्राप्रती असलेली निष्ठा प्रतीत होते. नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न किताब प्रदान करीत त्यांच्या संसदीय कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून तीन वेळा काम पाहिले, पहिल्यांदा १६ मे ते १ जून १९९६, दुसऱ्यांदा १९ मार्च १९९८ ते १२ ऑक्टोबर १९९९ आणि नंतर तिसऱ्यांदा १३ ऑक्टोबर १९९९ ते २२ मे २००४ अशी त्यांची पंतप्रधान पदाची गौरवशाली कारकीर्द झाली. भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आणि त्यांचा कार्यकाळ याप्रमाणे : 

  • १९८०–८६ अटलबिहारी वाजपेयी (मध्य प्रदेश )
  •  १९८६–९१ लालकृष्ण अडवाणी (गुजरात )
  •  १९९१–९३ मुरली मनोहर जोशी (उत्तर प्रदेश), 
  • १९९३–९८ लालकृष्ण अडवाणी (गुजरात ),
  • १९९८–२००० कुशाभाऊ ठाकरे (मध्य प्रदेश ), २०००–०१ बंगारू लक्ष्मण (तेलंगणा),
  •  २००१–०२ के. जन कृष्णमूर्ती ( तमिळनाडू) ,
  •  २००२–०४ व्यंकय्या नायडू (आंध्र प्रदेश),
  • २००४–०६ लालकृष्ण अडवाणी (गुजरात ),
  •  २००६–०९ राजनाथ सिंह (उत्तर प्रदेश),
  • २००९–१३ नितीन गडकरी (महाराष्ट्र),
  • २०१३–१४ राजनाथ सिंह (उत्तर प्रदेश),
  •  २०१४–२० अमित शाह (गुजरात ),
  •  २०२०- २०२५ जगत प्रकाश नड्डा ( हिमाचल प्रदेश) आणि 
  • २०२५ साली नितीन नबीन हे बिहारचे नेते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.

 दरम्यानच्या काळात १९८७ साली विलेपार्ले येथे महाराष्ट्र विधानसभेची पोट निवडणूक जाहीर झाली. या पोटनिवडणुकीत डॉ. रमेश प्रभू हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे होते. जनता पक्षाचे प्राणलाल व्होरा आणि कॉंग्रेसचे प्रभाकर कुंटे हेही निवडणूक लढवीत होते. नव्याने (सात वर्षाचा) स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार प्राणलाल व्होरा यांना पाठिंबा दिला होता. तर शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी शिवसेनेच्या डॉ रमेश प्रभू यांना समर्थन दिले. या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगाल मध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, अशी हिंदुत्वाची व्याख्या निवडणूक प्रचारात सांगितली. परिणामी शिवसेनेचे डॉ रमेश प्रभू हे निवडून आले. 

शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडून येऊ शकते हे भारतीय जनता पक्षाचे चाणाक्ष चाणक्य प्रमोद व्यंकटेश महाजन यांनी हेरले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत चर्चा करुन शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षाची युती घडवून आणली. १९८९ साली लोकसभा आणि १९९० साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती म्हणून मैदानात उतरले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांना स्पष्ट सांगितले की देशात भाजप मोठा भाऊ तर महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ म्हणून निवडणूक लढवील. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेली ही भूमिका मान्य केली. विदर्भात स्वतंत्र विदर्भ ही भारतीय जनता पक्षाची भूमिका होती तर शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भाला विरोध होता. शिवसेनेच्या भूमिकेला विदर्भात चांगले समर्थन मिळाले होते. १९८५ साली गुलाबराव गावंडे यांनी मराठा महासंघाचे शिवसेनेत विलीनीकरण करून शिवसेनेत स्वतः ला झोकून दिले. शिवसेना आणि भाजप युती म्हणून १९९० च्या निवडणुकीत अनुक्रमे १७१ आणि ११७ जागा लढवीत होती.

 परंतु प्रमोद महाजन यांनी चाणाक्षपणे विदर्भात भारतीय जनता पक्षाचे जास्त उमेदवार उभे करीत ज्या पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस शिवाय दुसरे पक्ष टिकाव धरू शकत नाहीत अशा ठिकाणी शिवसेनेला जास्त आणि भाजपने कमी जागा लढविल्या. परिणामी १७१ जागा लढविणाऱ्या शिवसेनेला ५२ आणि ११७ जागा लढविणाऱ्या भाजपच्या ४२ जागा निवडून आल्या. मतांच्या टक्केवारीत शिवसेनेपेक्षा भारतीय जनता पक्षाची टक्केवारी जास्त झाली हे ओघानेच आले. शिवसेनेच्या खांद्यावर उभे राहून गगनाला गवसणी घालण्याचा आणि पायाने शिवसेनेला खाली दाबण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव होता. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर काही चालत नव्हते. तरी करायचे तेच भारतीय जनता पक्ष करीत होता. 

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत राममंदिर प्रश्नावर कारसेवकांनी प्रचंड प्रमाणात आंदोलन केले आणि बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदर सिंह भंडारी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, बाबरी का ढॉंचा किसने गिराया ? बाबरी मस्जिद गिराने वाले कौन थे ? या प्रश्नावर घूमजाव करीत, "नहीं वह भारतीय जनता पार्टीके नहीं थे, बजरंग दल के नहीं थे, विश्व हिंदू परिषद के नहीं थे |" फिर वह कौन थे ? या प्रश्नावर सुंदर सिंह भंडारी पटकन बोलून गेले की, वह शायद शिवसेनाके होंगे. बाबरी पाडणाऱ्यांमध्ये मराठी भाषिक मोठ्या प्रमाणावर होते अशी तिथे चर्चा होती. भंडारींच्या घूमजाव वर तत्काळ कलानगर, वांद्रे येथून एकच डरकाळी फोडली गेली ती म्हणजे जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रुपाने डरकाळी फोडणाऱ्या वाघाची होती. लगेचच धर्मवीर आनंद दिघे यांनी, "गर्व से कहो हम हिंदू हैं !" अशा घोषणेचे आणि बाबरी मशीद पाडतांनाचे फलक झळकावले, दिनदर्शिका काढल्या. पण त्या जप्त करण्यात आल्या. 

भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरचे कचखाऊ धोरण साऱ्या जगासमोर आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेमुळे त्यांना हिंदुहृदयसम्राट हा किताब जनतेनेच दिला. १९९५ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती सत्तेवर आली. ४५ अपक्ष आमदारांनी युतीला पाठिंबा दिला होता. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर गजानन जोशी यांनी मुख्यमंत्री म्हणून तर भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शिवतीर्थावर ऐतिहासिक अभूतपूर्व सोहळ्यात राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांच्या कडून शपथ घेतली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, ज्येष्ठ समाजसेवक किसन बाबुराव उर्फ अण्णा हजारे, मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे गाजलेले उपायुक्त गोविंद राघो खैरनार यांच्या सह अरबी समुद्राला लाजवेल अशा अथांग जनसागराच्या साक्षीने हा शपथविधी सोहळा झाला. 

२००२ साली गोध्रा येथे जळीतकांड झाले. कारसेवकांच्या गाडीला आग लावण्यात आली. या अग्निकांडात डब्यांबरोबरच निष्पाप कारसेवकांचा मृत्यू झाला. गुजरात चे मुख्यमंत्री होते नरेंद्र दामोदरदास मोदी. या प्रकरणी अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर वक्रदृष्टी ठेवत त्यांना हटवण्यासाठी विचार केला. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लालकृष्ण आडवाणी यांना सुस्पष्ट शब्दांत सांगितले की, नरेंद्र मोदी को हात मत लगाओ, मोदी गया तो समझो गुजरातसे भारतीय जनता पार्टी गई. नरेंद्र मोदींवर कारवाई टळली. २०१३ साली भारतीय जनता पक्षाचे घटनादुरुस्ती अधिवेशन मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाले. या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना तीन वर्षांचा कार्यकाळ वाढवून द्यावा तद्वतच भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनाही तीन वर्षे मुदत वाढवून देण्यात यावी, अशी घटना दुरुस्ती करण्यात आली. 

नितीन गडकरी हे राष्ट्रीय अध्यक्ष तर सुधीर मुनगंटीवार हे प्रदेशाध्यक्ष होते. नव्या घटना दुरुस्ती मुळे नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्येकी तीन तीन वर्षे मुदतवाढ मिळणार होती. परंतु गडकरी यांच्या पूर्ती कारखान्याच्या (नसलेल्या) घोटाळ्याचे प्रकरण पुढे करण्यात आले परिणामी गडकरी यांनी राजीनामा दिला आणि राजनाथ सिंह हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांच्या मुदतवाढीला गोपीनाथ मुंडे यांनी आक्षेप घेतला. मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष पदावर राहिले तर मी पक्ष सोडून जाईन, अशी भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी घेतली. मुनगंटीवार म्हणाले की मला पदावर ठेवा किंवा पदमुक्त करा, मी पक्षातच राहीन पण मुंडे यांना पक्षाबाहेर जाण्यापासून रोखा. सुधीर मुनगंटीवार यांच्या समंजस भूमिकेमुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा मार्ग सुकर झाला. गोपीनाथ मुंडे यांनी नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुचविले. सर्वच जण बुचकळ्यात पडले. मुंडे यांनी गडकरींच्या माणसाची कशी काय शिफारस केली ? परंतु फडणवीस हे तर ना गडकरींचे किंवा ना मुंडे गटाचे. ते होते रेशीमबागेचे. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले. 

२०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. केंद्रीय मंत्रिमंडळाची यादी आली. नितीन जयराम गडकरी हे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले असल्याने पक्षातील ज्येष्ठताक्रम लक्षात घेता त्यांचे नाव केंद्रीय मंत्री म्हणून मुक्रर झाले परंतु गोपीनाथ मुंडे हे बीड लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून येऊनही त्यांचे नाव केंद्रीय मंत्रिमंडळ यादीत नव्हते. गोपीनाथ मुंडेंची घालमेल सुरू झाली. त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून घेतले. पण नरेंद्र मोदी यांना कसे समजावून सांगणार? अखेर प्रदेशाध्यक्ष या नात्याने देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी यांच्या दरबारात हजर झाले. मोदी फडणवीस चर्चा झाली. फडणवीस यांनी युक्तिवाद करीत गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला. २६ मे २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. 

दुर्दैवाने (महाराष्ट्र आणि देशाच्या) गोपीनाथ मुंडे यांचे ३ जून २०१४ रोजी अपघाती (?) निधन झाले. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष पूर्णतया देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आला. २४ सप्टेंबर २०१४ रोजी एकनाथ खडसे यांनी शिवसेनेच्या बरोबरची २५ वर्षे जुनी युती तोडण्याची घोषणा केली. (मला तसे सांगितले गेल्याचा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे) कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची लोकशाही आघाडी सुद्धा अर्ध्या तासात तुटली. ऑक्टोबर २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या. भारतीय जनता पक्ष १२३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. ६५ जागा जिंकणारी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आली. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. 

भारतीय जनता पक्षाची रणनीती पूर्णपणे बदलली. वाजपेयी आडवाणी यांचा पक्ष म्हणून असलेली ओळख मोदी शाह यांच्या नावाने ओळखण्यात येऊ लागला. भारताला स्वातंत्र्यच मुळात १९४७ ऐवजी २०१४ मध्ये मिळाल्याचे देशातील १४० कोटी नागरिकांच्या मनावर बिंबवणे सुरू झाले. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांची कारकीर्द पुसण्यासाठी अहमहमिका लागली. जे काही केले ते सर्वकाही नरेंद्र दामोदरदास मोदी यांनीच केले. अर्थात नोटबंदी, आधार कार्ड, जीएसटी अशा गोष्टी नरेंद्र मोदी यांनीच केल्या. नाही म्हणायला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेली घटनेचे ३७० वे कलम रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. (त्यातली गोम त्यांनाच माहीत.) लाल किल्ल्यावर भाषण करतांना एका बाजूला भ्रष्टाचार मुक्त भारत आणि कॉंग्रेसमुक्त भारत तसेच परिवारवाद अशा राणा भीमदेवी थाटात घोषणा करण्यात आली. दरवर्षी हेच पालुपद. पण प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचार मुक्त भारत ऐवजी भ्रष्टाचार युक्त भाजप आणि काँग्रेस मुक्त भारत ऐवजी कॉंग्रेसयुक्त भाजप अशी परिस्थिती निर्माण झाली. 

परिवारवादाबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते बोलूच शकत नाहीत अशा प्रकारे सर्वांचे सर्वच नातेवाईक या ना त्या पदावर विराजमान करुन ठेवले आहेत. कमी होते म्हणून की काय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून लोकशाही मार्गाने आलेले महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून टाकून घटनेच्या १० व्या अनुसूचि ला धाब्यावर बसवून असंवैधानिक पद्धतीने सरकार स्थापन केले. आज जो भारतीय जनता पक्ष भला मोठा दिसतोय तो सूज आलेला, अन्य पक्षातील राजकारणी लोकांना घाऊक पद्धतीने आपल्या पक्षात प्रवेश देत मोठा केलेला आहे, हे नाकारता येणार नाही. भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणतात की, नंदीबैलाला झूल पांघरण्यासाठी हे सर्व करावेच लागते. निष्ठावंत मधू चव्हाण, माधवराव भांडारी आदी नेते अडगळीत आणि अशोक चव्हाण चार दिवसात राज्यसभेवर. हीच भारतीय जनता पक्षाची शोकांतिका आहे. 

 ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पक्ष स्थापन झाला हे पक्षाच्या नवहिंदुत्ववादी नेत्यांनाच माहीत नाही. 'सौगात ए मोदी' चालते, रोजा सोडण्यासाठी मुस्लिम बांधवांच्या मेळाव्यात फरकॅप घालत शीरकूर्मा ओरपलेले चालते, असंख्य मुस्लिम नेते/कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात आलेले चालतात. मैं कुरेशी बननेको तैय्यार हुं असे मुस्लिम बांधवांना खुष करण्यासाठी केलेले विधान चालते. मुख्तार अब्बास नकवी, शहानवाज हुसेन, अब्दुल अलीम खान भारतीय जनता पक्षाचे नेते झालेले/भारतीय जनता पक्षात आलेले चालतात. मजारीवर भारतीय जनता पक्षाचे नेते चादरी चढवतात हे चालते. सर्वात कहर म्हणजे अफगाणिस्तान येथे गेलेले विमान सरकारी अधिकृत कार्यक्रमात नसतांना इस्लामाबाद येथे जाऊन नवाज शरीफ यांची गळाभेट केलेले चालते. पण आपली विचारसरणी कायम ठेवणाऱ्या शिवसेनेचा इतिहास माहित नसलेल्यांनी उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणे याचा अर्थ हिंदुत्व सोडणे, असा सोयीस्कर अर्थ लावणे याला काय म्हणावे. 

आज भारतीय जनता पक्षाचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते असे आहेत की त्यांना 'कमळातला वाघ' म्हटले जाते. (स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका नेत्याला प्रमोद महाजन यांच्या उपस्थितीत सांगितले होते). असंख्य कार्यकर्ते हा आपलाच पक्ष आहे कां ? असे कुचेष्टेने खाजगीत बोलतांना आढळतात. भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या आणि भारतीय जनता पक्षाच्या धुलाई यंत्रात जाऊन स्वच्छ, शुद्ध झालेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. नरेंद्र मोदी यांचा उद्धार करणारे राष्ट्रीय नेते/प्रवक्ते मोठमोठ्या पदांवर नियुक्ती होत 'निष्ठावंतांचे' श्रेष्ठी बनतात. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना पर्याय म्हणून भारतीय जनता पक्ष नवनाथ बन यांना पुढे आणल्याचे सांगण्यात येते. पण दोघांची तुलना तरी होऊ शकते कां ? असा प्रश्न विचारला जातो. असो, निष्ठावंतांना पायघड्या घातल्या गेल्या तर भारतीय जनता पक्षाची सुवर्णमहोत्सवी वाटचाल खऱ्या अर्थाने चांगली ठरु शकेल. 

वि दा सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील हिंदुत्व प्रत्यक्षात आणण्यासाठी निखळ भगवा झेंडा शिवसेनेप्रमाणे व्हावा आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न किताब जाहीर करण्यात आले तर सर्वांना निश्चितच आनंद होईल. नाही म्हणायला ज्यांना ६ एप्रिल रोजी काय झाले हेच माहीत नसेल तर त्यांना अटलबिहारी वाजपेयी यांचा आत्मा क्षमा करील, अशी अपेक्षा करु या. "सरकारे आएगी, सरकारे जाएगी; लेकिन देश टिकना चाहिए," असे म्हणणाऱ्या लोकांच्या ह्रुदयात अटल स्थान मिळविणाऱ्या कविमनाच्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नातील हिंदुस्थान निर्माण होवो हीच भावना ! भारतीय जनता पक्षाची ४५ वर्षांची वाटचाल ही अटलबिहारी वाजपेयी यांच्या गांधीवादी समाजवाद पासून नरेंद्र मोदी यांच्या (बेगडी) हिंदुत्वापर्यंत असल्याचे म्हटले तर ते वावगे ठरू नये. तूर्तास इतकेच !! 

  •  योगेश वसंत त्रिवेद
  • (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com