Top Post Ad

कामगारांच्या मागण्यांवर पालिका प्रशासनाकडून सकारात्मक निर्णयाचे आश्वासन

बृहन्मुंबई महापालिकेतील पहिली मान्यताप्राप्त युनियन मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या वतीने कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेले ‘बोंबा बोंब’ आंदोलन मंगळवार, ५ मे रोजी दुपारी आझाद मैदान येथे उत्स्फूर्त प्रतिसादात आणि शांततेत पार पडले. संघाचे सरचिटणीस सतिश वामन राजगुरू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ड्रेनेज, बाजार, पर्जन्य वाहिनी, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विभाग तसेच आया व कक्ष परिचर अशा विविध खात्यांतील कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कामगारांनी आपल्या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनात वारसाहक्काने (पी.टी.) नोकऱ्या देणे, मोटर लोडर कामगारांना कायमस्वरूपी सेवा देणे, सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देणे, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणे तसेच जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागण्या अधोरेखित करण्यात आल्या. आंदोलनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये कंत्राटी कामगारांच्या सेवाशर्तींचा पुनर्विचार, वारसाहक्क प्रकरणांतील उमेदवारांना नियुक्ती, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे उपलब्ध करून देण्याची मागणी ठळकपणे मांडण्यात आली.

महापालिकेच्या वतीने भरती प्रक्रिया लवकरच गतीमान केली जाईल, रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरली जातील, तसेच काही मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे संघटनेने सरचिटणीस सतीश राजगुरू यांनी सांगितले. जुनी पेन्शन योजनेबाबत शासन पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहितीही देण्यात आली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, कामगारांच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com