Top Post Ad

शंभर वर्ष जुना बुरुज आणि हातात बारूद घेऊन येणारा एक नेता!

.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ब्रिटीशांच्या काळात स्थापना.  या शंभर वर्षांमध्ये खूप काही घडलं. छोटीशी कापडी पिशवी सोबत घेऊन स्वयंसेवक गावोगावी फिरायचे. खूप मेहनत करून गुरुजींनी सांगितलेले विचार हळूहळू लोकांपर्यंत पसरवायचे. थोडीफार गुरुदक्षिणा मिळायची. संघाचे काम चालू होते.  पुढे गांधीजींची हत्या झाली. संघावर बंदी आली. आणीबाणी लागली. संघावर बंदी आली. बाबरी मशीद प्रकरण झाले. संघावर बंदी आली. सरदार पटेल, इंदिरा गांधी आणि नरसिंहराव यांनी संघाला ओळखले होते. कठोर कारवाई केली होती. अनेक सूचना दिल्या होत्या. म्हणजे कसं वागायचं, काय करायचं, काय करू नये, वगैरे वगैरे. तरीही संघ वाढत होता. शांतपणे आपलं काम करत होता. 

सुरुवातीला संघाच्या साथीदारांना तिरंगा ध्वज आवडत नव्हता. पुढे २००१ मध्ये राष्ट्रप्रेमी युवा दलाचे  तीन युवक आरएसएस मुख्यालयात घुसले आणि त्यांनी तिरंगा ध्वज फडकवला. संघाच्या काही लोकांना सुरुवातीला आपली राज्यघटना पटत नव्हती. बऱ्याच गोष्टींना विरोध होता.  पण आता शतकपूर्ती होत असताना संघाचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. त्यांचे  प्रचारक असलेले नरेंद्रभाई एकदा नाही दोनदा नाही तर तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झालेले आहेत. २० राज्यांमध्ये त्यांचे सरकार आहे. शिवाय दिल्ली आणि पुडुचेरीमध्येही त्यांचीच सत्ता आहे.  पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना आरएसएस ही जगातील सर्वात मोठी एनजीओ आहे हे जाहीर करतात. आरएसएसची प्रचंड तारीफ करतात. राजमान्यता जगजाहीर होते. 

सर्व काही व्यवस्थित चालू असतं. आता आरएसएसचे सेवक, प्रचारक कापडी पिशवी घेऊन पायीपायी गावोगाव फिरत नाहीत. आता महागड्या गाड्या, महागडे हॉटेल्स. कार्पोरेट ऑफिसेस सुद्धा फिकी पडतील अशी त्यांची फाइव स्टार कार्यालये. साठ हजार शाखा. कोट्यावधी स्वयंसेवक. बोलता बोलता भारतातील सर्वात मोठ्या संघटनेमध्ये त्यांचे रुपांतर होते.  आरएसएसचं एवढं सगळं राजरोसपणे चालू असतं. अचानक एक दलित नेता समोर येतो. त्याच्या राज्यामध्ये संघाच्या ४१२७ शाखा आहेत, हे तो पाहतो. १३८९ साप्ताहिक मिलन कार्यक्रम असतात, हे त्याला दिसते. समाजोत्सव कार्यक्रमांमध्ये १९,६१,१५८ लोक सहभागी होतात, हे पाहतो. त्याच्या मनात काही बेसिक प्रश्न निर्माण होतात. या संघटनेचं ‘लीगल स्टेटस’ काय आहे? फंडिंग कुठून येते? भारतीय राज्यघटनेप्रमाणे, कायद्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता होत आहे का? तो सरळ सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहितो. 

शंभर वर्षांमध्ये जे कधीही घडले नव्हते ते घडते. तो दलित नेता कुणी सामान्य माणूस नसतो तर त्या राज्याचा गृहमंत्री असतो. ते आठ महत्त्वाचे मुद्दे असलेले पत्र त्या सरकारकडून आलेले असते. शंभर वर्षांचे बुरुज ढासळू लागते की काय अशी स्थिती निर्माण होते.  इतके दिवस आपलेच लोक इतरांना ‘कागद बताव’ म्हणत होते. आता अचानक आपल्यावरच ‘कागद दाखवायची वेळ आली, हे पाहून अनेक पाठीराखे खिन्न होतात. आम्ही Body of Individuals आहोत. ब्रिटीश काळात नोंदणी करावी लागत नव्हती. गुरुदक्षिणा आहे म्हणून इन्कमटॅक्स द्यावा लागत नाही, असे दावे केले जातात. पण प्रश्न निर्माण होतो की ‘रामकृष्ण मिशन’ची नोंदणी कशी झाली? ती तर आरएसएसच्या पेक्षाही जुनी संस्था आहे. महेश जेठमलानी सारखे काही तज्ज्ञ वकील सोशल मिडीयावर सल्ले देऊ लागतात. पण तो राज्याचा गृहमंत्री असलेला दलित नेता शांतपणे म्हणतो, “तुम्ही नेहमीच म्हणतात की आम्ही ऑडीट करून ठेवतो. सरकारने विचारले तर दाखवू. आता सरकार विचारत आहे. दाखवा. तुमच्याकडे कागद असतील तर आमच्या तोंडावर फेका. आमची चूक असेल तर आम्ही माफी मागू. तुमची चूक असेल तर तुम्ही संविधानचा सन्मान करा आणि कागदपत्र तयार करा.” 

पण सरसंघचालक यांनी दिलेले उत्तर तर फारच चमत्कारिक आहे. ते म्हणतात, हिंदू धर्माचे कुठे रजिस्ट्रेशन झालेले आहे? आता बोला! यापेक्षाही खतरनाक उत्तर भाजपचे खासदार रमेश जीगजीनागी यांच्याकडून आले. ते म्हणतात, दलितांनी आरएसएस ला प्रश्न विचारू नयेत! हे तर आणखी खतरनाक! मोदी शहा यांच्या काळात कर्नाटकचे धाडसी गृहमंत्री प्रियांक खर्गे हे आरएसएसच्या शंभर वर्षांच्या जुन्या बुरुजाला बारूद लावायचे काम करू पाहत आहे. जे काम नेहरू, पटेल, गांधी यांना सुद्धा करावेसे वाटले नाही, ते काम करून त्यांनी देशाच्या येऊ घातलेल्या राजकारणाची दिशा बदलली आहे.   

-दिलीप लाठी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com