गेल्या काही वर्षांत उभ्या केलेल्या राजकीय प्रतिमेचे प्रतीक काय आहेत. संसद असो, निवडणूक प्रचार असो किंवा सार्वजनिक कार्यक्रम — सर्वत्र धर्म, साधू-संत, पूजाअर्चा आणि व्यक्तीभोवती उभारलेला भव्य देखावा दिसतो. पण प्रश्न असा आहे की, देश चालतो तो फोटोशूटने की संविधानाने? भारताची ओळख कोणत्याही एका धर्माच्या राष्ट्राप्रमाणे नाही. भारताची ओळख आहे लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता आणि समान नागरिकत्व. संसद ही कायदे करण्याची जागा आहे, धार्मिक विधींचे मंच नाही. जेव्हा राज्यसत्ता आणि धर्म यांची सीमारेषा जाणीवपूर्वक पुसली जाते, तेव्हा लोकशाही कमकुवत होऊ लागते.
गेल्या काही वर्षांत आपण काय पाहिले?
विरोधी पक्ष फोडणे.
निवडून आलेले आमदार-खासदार पळवणे.
पक्षांवर आणि चिन्हांवर दावे करणे.
केंद्रीय यंत्रणांचा राजकीय वापर झाल्याचे आरोप.
निवडणुकांपेक्षा प्रतिमा उभारणीवर जास्त भर.
प्रत्येक यशाचे श्रेय एका व्यक्तीला, प्रत्येक अपयशासाठी दुसऱ्यांना दोष.
ही लोकशाहीची लक्षणे नाहीत; ही व्यक्तीपूजेची लक्षणे आहेत.
देशात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण आणि आरोग्याच्या समस्या आहेत. पण त्यावर चर्चा कमी आणि फोटोगिरी, इव्हेंटबाजी, चमकोगिरी, भव्य सोहळे आणि सततचा प्रचार अधिक दिसतो. शासन जर कामापेक्षा प्रतिमानिर्मितीवर जास्त भर देऊ लागले, तर ते लोकशाहीसाठी धोक्याचे संकेत असतात. कशाहीमध्ये नागरिक राजा असतो. हुकूमशाहीमध्ये नेता राजा बनतो. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारले जातात. हुकूमशाहीमध्ये प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते. लोकशाहीमध्ये संविधान सर्वोच्च असते. हुकूमशाहीमध्ये व्यक्ती सर्वोच्च बनवली जाते. भारतीय संविधानाने आपल्याला धर्मस्वातंत्र्य दिले, पण राज्यधर्म दिला नाही. सर्व धर्मांना समान सन्मान देण्याची जबाबदारी दिली, पण कोणत्याही धर्माच्या आधारे सत्ता चालवण्याचा अधिकार दिला नाही. आज गरज आहे ती रामाच्या नावाने मत मागणाऱ्यांची नव्हे, तर रामाच्या आदर्शांची आठवण करून देणाऱ्यांची. राम हे न्याय, कर्तव्य आणि लोककल्याणाचे प्रतीक मानले जातात. जर रामाचे नाव घेऊन समाजात फूट पाडली जात असेल, विरोधकांना शत्रू मानले जात असेल आणि संविधान दुय्यम ठरवले जात असेल, तर तो रामाचा मार्ग नाही. भारत वाचवायचा असेल तर व्यक्तीपेक्षा संविधान मोठे मानावे लागेल. धर्मापेक्षा नागरिकत्व मोठे मानावे लागेल. प्रचारापेक्षा काम मोठे मानावे लागेल.
- देश मंदिरांनी नव्हे तर संविधानाने चालतो.
- देश घोषणांनी नव्हे तर संस्थांनी टिकतो.
- देश व्यक्तीने नव्हे तर लोकशाहीने वाचतो.
- म्हणूनच आजचा खरा नारा असा असायला हवा —
- "जय संविधान, जय लोकशाही, जय भारत
0 टिप्पण्या