महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काल - परवा मुंबईतील बीकेसी मैदानावर जे घडलं, त्याने सामान्य मतदाराला आणि वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या कार्यकर्त्याला एकाच वेळी अवाढव्य धक्का दिला आहे. सुप्रिया सुळे यांच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडला. पण हा निव्वळ एक कौटुंबिक सोहळा होता का? तर अजिबात नाही. या लग्नसोहळ्याच्या आडून महाराष्ट्राच्या राजकारणात जी नवी समीकरणं शिजली आहेत, ती पाहता हा विवाह कोणताही सामान्य प्रेमविवाह नसून, पूर्णपणे राजकीय सोयीसाठी घडवून आणलेला एक ठरवून केलेला विवाह आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुरोगामी विचारांची ढाल पुढे करणाऱ्या पवार कुटुंबाच्या या घरच्या लग्नासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुढाकार घेतला, मध्यस्थी केली आणि हे लग्न जुळवून आणलं. हा प्रकार थेट सांगतोय की, वरकरणी चाललेला वैचारिक विरोध हा फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आहे; पडद्यामागे तर महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारणच गिळंकृत करण्याचं एक मोठं षडयंत्र रचलं जात आहे.
आजवर महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाचा जप करायचा, पुरोगामित्वाची छाती ठोकून जाहिरात करायची आणि प्रत्यक्षात मात्र स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची, हाच पवारांच्या राजकारणाचा खरा चेहरा राहिला आहे. आजतागायत पवार कुटुंबाने जे काही राजकारण केलं, ते निव्वळ सत्ताकेंद्रित आणि कुटुंबकेंद्रित राहिलं आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या हातातली सत्ता टिकून राहण्यासाठी, आर्थिक साम्राज्य सुरक्षित राहण्यासाठी जर ऐनवेळी विचारधारा सुळावर चढवावी लागली, तरी या मंडळींना त्याचं काहीही सोयरसुतक नसतं. म्हणूनच, राज्यात किंवा देशात सरकार कोणत्याही पक्षाचं असो, हे लोक सगळ्याच व्यवस्थांमध्ये आधीपासूनच व्यवस्थित सेट असतात.
या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने मुंबईत जे चित्र पाहायला मिळालं, ते पाहून डोक्यावर पक्षाचा प्रखर वैचारिक झेंडा घेऊन फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असेल. ज्या भाजपला, ज्या आरएसएसला, ज्या अदानी-अंबानी आणि मोहन भागवतांना राजकीय मंचावरून, जाहीर सभांमधून उघडपणे शिव्या घातल्या गेल्या, ज्यांच्यावर टीका करून मतांचं राजकारण केलं गेलं, तेच सगळे बडे नेते, उद्योगपती तिथे झाडून उपस्थित होते. अत्यंत आपुलकीने आणि हसतमुखाने गळाभेटी घेतल्या जात होत्या. शरद पवार आणि लखानी कुटुंबाचे या सगळ्यांशी असलेले व्यावसायिक आणि सौहार्दाचे संबंध या सोहळ्याने जगासमोर आणले आहेत. ज्यांना शत्रू म्हणून दाखवलं गेलं, त्यांच्याशीच जर एवढी घट्ट सोयरिक असेल, तर मग जनतेसमोर चाललेला हा विरोध काय फक्त एक नाटक आहे?
वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या जनतेला वारंवार एका गोष्टीची जाणीव करून दिली आहे. शरद पवार हे भाजपचे हस्तक म्हणून काम करतात, हा आरोप आज या लग्नाच्या निमित्ताने तंतोतंत खरा ठरताना दिसतोय. पवारांनी आपल्या कुटुंबातील आणि पक्षातील लोक आधीच वेगवेगळ्या मार्गाने भाजपमध्ये पाठवून ठेवले आहेत, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत सत्ता घरातच राहील. या सगळ्या खेळात सर्वात मोठा बळी ठरला आहे तो महाराष्ट्रातील सामान्य कार्यकर्ता आणि मतदार. पवारांच्या पुरोगामी आणि सेक्युलर आवाहनावर विश्वास ठेवून, त्यांच्या पाठीमागे धावून महाराष्ट्रातील हजारो तरुणांनी, कार्यकर्त्यांनी आपली आयुष्य उद्ध्वस्त करून घेतली. पक्षासाठी गुन्हे अंगावर घेतले, विरोधकांशी शत्रुत्व पत्करलं. पण दुसरीकडे, ज्यांच्यासाठी हे सगळं केलं, त्या शरद पवारांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अशा प्रकारची राजकीय लग्नं लावून स्वतःच्या पुढच्या सात पिढ्या एकदम सेफ करून ठेवल्या आहेत. कार्यकर्त्यांचा जीव मात्र आजही सत्तेच्या राजकारणात टांगणीला लागलेला आहे आणि नेतेमंडळी मात्र विरोधकांशीच हातमिळवणी करून स्वतःची साम्राज्यं टिकवून आहेत. महाराष्ट्राच्या सुजाण जनतेने आता हा ढोंगीपणा ओळखण्याची वेळ आली आहे
0 टिप्पण्या