Top Post Ad

मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी सहायक आयुक्तांसह चौघांचे चौकशीसापेक्ष निलंबन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत  २ जुलै, दुपारी कुर्ला साकीनाका येथील खैरानी मार्गालगत मनुष्य प्रवेशिकेवर (Manhole) ‘संरक्षक जाळी' बसविण्याची कार्यवाही सुरू असताना एका व्यक्तीचा संबंधित मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची महानगरपालिका आयुक्त  अश्विनी भिडे यांनी गंभीर दखल घेत ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह सहायक/दुय्यम अभियंता (परिरक्षण, एल विभाग) दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता (परिरक्षण, एल विभाग) अभिजीत चौगुले, सहायक अभियंता (मलनिस्सारण प्रचालन)  उत्तम पाटील यांना चौकशीसापेक्ष निलंबित केले आहे. 

तसेच, सुरक्षेच्या नियमांबाबत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आणि महानगरपालिका क्षेत्रात अशा घटनेची पुनरावृत्ती होवू नये यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी गठीत करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 'एल' विभाग परिसरात कुर्ला साकीनाका येथील खैरानी मार्गालगत मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत 'मनुष्य प्रवेशिकेवर (Manhole) संरक्षक जाळी' बसवण्याची कार्यवाही सुरू होती. ही कार्यवाही सुरू असताना कंत्राटदराने सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे शकृत दर्शनी दिसून आले. त्यावेळी रस्त्यावरून असलम इसाक शेख (वय ५५ वर्षे) हे मोबाईलवर बोलत पायी जात होते. शेख मॅनहोलजवळ आले  त्यावेळी मॅनहोलजवळ कामासाठी उभ्या असलेल्या व्यक्तींनी त्यांना आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने शेख यांचा तोल जाऊन ते 'मॅनहोल' मध्ये पडले. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. तथापि, दुर्दैवाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. 

या घटनेची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी चौकशी करण्याचे   तसेच सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.  सदर घटना कशामुळे घडली, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अशी घटना पुन्हा घडू यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीत उपआयुक्त (सामान्य प्रशासन), उपआयुक्त (परिमंडळ ७), उपआयुक्त (पायाभूत सुविधा) सदस्य आहेत. सदर चौकशी समिती सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडू नये, या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनुष्य प्रवेशिकेची कामे करताना चारही बाजूंनी सुरक्षारोधक (Barricades) लावण्याचे निर्देश पुन्हा एकदा देण्यात आले आहेत. तसेच, पुढील आठ दिवसात महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्वे मॅनहोलची १०० टक्के पाहणी करावी. त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करावी. त्याबाबतचा अहवाल तयार करण्याचे निर्देश सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सातही परिमंडळाचे उपआयुक्त, २६ प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त यांना देण्यात आले आहेत.  तथापि, पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांनी मार्च २०२६ पासून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेवून सर्व खात्यांना मॅनहोलला जाळी लावण्याचे आदेश दिले होते.
या दुर्दैवी घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने १० लाख रुपयांचे अर्थयहाय्य करण्याचे माननीय महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले आहे

मुंबईत मागील दोन दिवस पडलेल्या पावसाने भाजपा सरकार, बीएमसी प्रशासन व महापौरांनी नालेसफाईचे केलेले दावे फोल आहेत, हेच दाखवून दिले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईकरांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. पावसात मुंबईत होणारा प्रत्येक मृत्यू हा अपघात नाही तर ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे. पहिल्या पावसात झाड कोसळून एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला आणि आज साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला. हे अपघात नाहीत, तर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराच्या हत्या आहेत.  या हत्येप्रकरणी महापौर व पालिका आयुक्त यांच्यावरच ३०२ चे गुन्हे दाखल करा. मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? महापौर प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत, तर प्रशासन नेहमीप्रमाणे सूचना दिल्या, कारवाई सुरू आहे, चौकशी करू अशी उत्तरे देत आहे. पण एकमेकांवर जबाबदारी ढकलताना यांना लाज वाटत नाही का? मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडण्याच्या एक-दोन नव्हे तर सलग तीन घटना घडल्या. मागील वेळी महापौरांच्या दौऱ्यात कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्यावर चौकशीचे आदेश दिले गेले होते. आता एका सामान्य मुंबईकराचा जीव गेला आहे, आता कोणाची चौकशी होणार? आणि त्या चौकशीतून मृत व्यक्ती परत येणार आहे का?   मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजी कारभाराची जबाबदारी महापौर, उपमहापौर आणि महापालिका प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. तुमच्या चौकशीने जीव गेलेल्या मुंबईकरांचा जीव परत येणार नाहीत. मुंबईकरांना चौकश्या आणि आश्वासन नको, सुरक्षित मुंबई हवी आहे,     दरवर्षी पावासाळ्यापूर्वी सर्व कामे केल्याचा दावा केला जातो पण तो पावसात धुवून जातो. मग हे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात जातात? मुंबईच्या आजच्या परिस्थितीला सत्ताधारी महायुती व बीएमसी प्रशासनच जबाबदार असल्याचा ठपका ठेवूत मोठमोठ्या गप्पा मारणारे भाजपा नेते, महापौर व सुपर महापौर गेले कुठे? दोन दिवसाच्या पावसाने मुंबई शहरात जागोजागी पाणी साचले आहे, नाल्याचे पाणी रस्त्यावर, घरात शिरल्याचे दिसत आहे, उघडी मॅनहोल, जागोजागी पडलेले वृक्ष व मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेले दिसत आहेत. या सर्व प्रकाराला बीएमसीतील भ्रष्टाचार कारणीभूत आहे. कमीशन खाण्यामुळे सर्व कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे झाल्याचा दावा केला जातो पण प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती दिसत आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी, एखाद्या सखल भागात पाणी साचले म्हणजे मुंबई जलमय झाली असे नाही, असे बेजबाबदार विधान करून मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळले होते. आयुक्त यांनी स्वतः मुंबईचा दौरा करून पहावे, किती ठिकाणी पाणी साचले आहे. नाल्यांची सफाई व्यवस्थित झाली असती तर मुंबईची ही अवस्था झालीच नसती  -  मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com