पावसाळ्याच्या काळात अतिवृष्टी, पूरस्थिती, दूषित पाणी, साचलेले पाणी तसेच डासांची वाढ यामुळे जलजन्य, अन्नजन्य, कीटकजन्य व संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास अनेक गंभीर आजारांपासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करता येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांनी नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पूराचे पाणी ओसरल्यानंतरही अनेक आरोग्यविषयक धोके कायम राहतात. त्यामुळे नागरिकांनी पूरग्रस्त भागातून अनावश्यक हालचाल टाळावी. साचलेल्या पाण्याजवळ, उघड्या विद्युत तारा, वीजखांब किंवा विद्युत उपकरणांच्या संपर्कात जाणे धोकादायक ठरू शकते. पूरपरिस्थितीत स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. संभाव्य धोक्यांची जाणीव ठेवून स्वतःची व कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
पावसाळ्यात दूषित पाणी व अन्नामुळे अतिसार, कॉलरा, टायफॉईड, कावीळ यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावरचे, शिळे किंवा अस्वच्छ ठिकाणी मिळणारे अन्न सेवन करू नये. कच्चे अथवा अपूर्ण शिजवलेले अन्न टाळावे. फळे व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवूनच वापराव्यात. अन्न नेहमी ताजे, पूर्णपणे शिजवून आणि गरम असतानाच खावे. शिजवलेले अन्न दीर्घकाळ साठवून ठेवू नये. आवश्यक असल्यास ते झाकून ठेवून पुन्हा गरम करूनच सेवन करावे.स्वयंपाकघर, भांडी तसेच पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावीत. स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुण्याची सवय अंगीकारावी. रस्त्यावरील अस्वच्छ अन्नपदार्थांचे सेवन टाळावे.पिण्याचे पाणी उकळून किंवा योग्य पद्धतीने शुद्ध करूनच वापरावे. विशेषतः लहान मुले, गर्भवती माता आणि ज्येष्ठ नागरिकांनी उकळलेले पाणीच पिण्यास प्राधान्य द्यावे. परिसरातील पाणीपुरवठा आणि पाणी शुद्धीकरणाची नियमितता तपासावी. प्रवास करताना स्वतःसोबत सुरक्षित पिण्याचे पाणी बाळगावे.
डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी घरात व घराबाहेर कुठेही पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून किमान एकदा पाण्याची भांडी रिकामी करून स्वच्छ घासून पुसावीत. पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या, कुलर, फुलदाण्या यांना झाकण लावावे. न वापरण्यात येणारे टायर, डबे, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक वस्तू, बाटल्या यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. कुलर व फ्रिजच्या ट्रेमधील पाणी दर दोन ते तीन दिवसांनी बदलावे. डेंग्यूचा डास दिवसा चावतो, त्यामुळे पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करावेत तसेच डास प्रतिबंधक क्रीम, जाळ्या किंवा इतर उपायांचा वापर करावा.
लेप्टोस्पायरोसिस हा दूषित पाणी व चिखलाच्या संपर्कातून होणारा गंभीर आजार आहे. त्यामुळे पावसाळ्यात दूषित पाणी, चिखल किंवा मातीशी थेट संपर्क टाळावा. शेतात किंवा पाण्यात काम करताना गमबूट व हातमोजे वापरावेत. हातापायांना जखम असल्यास ती स्वच्छ ठेवून जंतुनाशक औषध लावावे. उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा. गोठे व जनावरांच्या आसपास स्वच्छता राखावी.ताप, तीव्र अंगदुखी, डोकेदुखी किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास विलंब न करता जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात तातडीने उपचार घ्यावेत. पूराच्या काळात बुडण्याचा धोका, विजेचा धक्का, जलजन्य व अन्नजन्य आजार, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारखे डासजन्य आजार तसेच सर्पदंशाच्या घटना वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक जोखीम टाळून सुरक्षित ठिकाणी राहावे.
खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास स्व-उपचार न करता तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार घ्यावेत –
* सतत ताप
* अतिसार किंवा उलट्या
* कावीळ
* तीव्र अंगदुखी
* डोळे किंवा त्वचा पिवळी पडणे
* श्वास घेण्यास त्रास
* त्वचेवर पुरळ किंवा रक्तस्त्राव
* सर्पदंश किंवा विजेचा धक्का
मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे आवाहन- जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यातील आरोग्यविषयक धोके टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छ व ताजे अन्न, डास नियंत्रण आणि परिसराची स्वच्छता या बाबींना प्राधान्य द्यावे. पूरग्रस्त किंवा पूरप्रवण भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. कोणतीही संशयास्पद लक्षणे दिसल्यास उपचारात विलंब न करता तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत संपर्क साधावा.
0 टिप्पण्या