Top Post Ad

डॉक्टरांना मारहाण प्रकरणातील रमेश म्हात्रे यांच्यासह सर्व आरोपींना २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका नवजात बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिल्याचा रागातून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी नगरसेवकासह चौघांना अटक केली. त्यांना आज न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्यात आले नाही. वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, तसेच वकिलांनी लाल फिती बांधून निषेध नोंदवल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. यावेळी  न्यायायालयाने सर्व आरोपींना २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

अटकेनंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र सिव्हील रुग्णालयातील डॉक्टरांनीही आंदोलन करीत निषेध नोंदवला. म्हात्रे यांना शुक्रवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  म्हात्रे यांच्यासोबत असलेले आणि रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घालण्यात सहभागी असलेले इतर तीन सह-आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. प्रत्येक आरोपीची भूमिका निश्चित करण्यासाठी, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी, मोबाईल फोन हस्तगत करण्यासाठी आणि घटनेशी संबंधित अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.  

रमेश म्हात्रे आणि  प्रमोद निकम, रमेश पवार, अक्षय कारंडे  यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. म्हात्रेच्या विरोधात यापूर्वी १८ गुन्हे दाखल आहेत. आरोपी रमेश पवार हा कल्याण डोंबिवली महापालिकेतील कंत्राटदार आहे. म्हात्रेनेच त्याला पायवाटा, गटारे बांधण्याची कामे मिळवून दिली आहेत. पवार हा हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेला आरोपी आहे. म्हात्रेसोबत मारहाण करण्यात पुढे असलेल्या तीन साथीदारांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि खून यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. म्हात्रेच्या अटकेनंतर त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला. तत्कालीन महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्या दालनात म्हात्रेने खुर्ची फेकली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे. म्हात्रेने यापूर्वी शिंदेसेनेचे नगरसेवक विश्वनाथ राणे, भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचाही गुन्हा दाखल आहे.  सभागृहात नगरसेवक दीपेश म्हात्रेसोबत झालेल्या वाद सर्वांना परिचीत आहे..
दरम्यान जुनी डोंबिवली परिसरात म्हात्रेच्या मुलाने बेकायदा इमारतीचे बांधकाम केल्याची तक्रार कल्पेश जोशी यांनी केली आहे. त्या तक्रारीची दखल पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी घेतली नसल्याचा जोशी यांचा आरोप आहे. जोशी यांनी नगरविकास खाते, कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. म्हात्रेच्या मुलाने बेकायदा बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

----------------------------

एका गर्भवती महिलेच्या उपचारात विलंब झाल्याच्या आरोपावरून शास्त्री नगर रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या कथित हल्ल्यातून हे प्रकरण उद्भवले आहे. या प्रकरणी म्हात्रे यांना कल्याण न्यायालयात हजर केले जात असताना वकिलांनी आरोप केला की पोलिस आरोपीना ‘व्हीआयपी वागणूक देत आहे.  त्यांना आत आणताना न्यायालयाच्या कक्षाबाहेरील परिसर रिकामा करण्यात आला आणि इतर वकिलांना प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी अनेक वकिलांना धक्काबुक्की केल्याचा दावा त्यांनी केला, ज्यामुळे त्यांनी न्यायालयाच्या आवारातच निषेध नोंदवला. या निषेधानंतर, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी पोलिसांनी दिली, असा आरोप वकिलांनी केला.

"ज्या आईने वडिलांचे छत्र केवळ अडीच वर्षाचे बाळ असताना हरवले, त्याच आईने काळजावर मोठा दगड ठेवून, आयुष्यभर संघर्ष करून पोटचा गोळा वाढवला, जपला, रुग्णांची सेवा आपला मुलगा करावा म्हणून मुलाला स्वतःच्या हिंमतीवर एकटीने शिकवले; त्याच अत्यंत गुणी, हुशार, मनमिळावू माझ्या डॉक्टर बाळाला मी स्वतः कधीच पाच बोटांनी पण शिवले नाही. त्या बाळाला सत्तेची माज असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी गुंडांची टोळी सोबत नेऊन मारून काढले. माझा मुलगा आठ दिवस झाले कॉटच्या खाली पण उतरत नाही, केवढा मानसिक धक्का  बसलेला आहे. व्हिडिओ बघणाऱ्याच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही. मी त्याची आई म्हणून मला तर त्या घाणेरड्या शिव्या ऐकवल्याच नाहीत. कोणी ऐकू पण शकणार नाही, इतक्या अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्याच्या शिव्यांवरून त्या माणसाची माणुसकी आणि लायकी कळते. त्याच्यावर कसले संस्कार झाले असतील हे सांगायलाच नको."

केडीएमसी डोंबिवलीच्या हॉस्पिटलमध्ये मस्तीने माजलेल्या गुंडावर ऑलरेडी 17 गुन्हे दाखल असताना, घमंड तोडण्यासाठी माझ्या डॉक्टर बाळाला हल्लेखोरांच्या तावडीत सापडावे लागले. मी त्याची आई म्हणून माझ्या जीवाची किती घालमेल झाली असेल याचा अंदाज जगातला कोणीच लावू शकणार नाही. आईचे काळीज धाय मोकलून रडले. माझ्या आतड्यांची आठ दिवस झाले अजून आग होतेय. बीपी लो चा पहिलेच त्रास, पण जी एकल विधवा महिला आपल्या लेकरांवर अख्खे आयुष्य काढते, तिचा श्राप त्या चार नालायक लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणतात प्रत्येकाचे दिवस भरले की त्याला असे कर्म सुचतात." पेशंटच्या आईने कितीही डोकं भडकावून दिले (त्या बाईला पण सहआरोपी करा), तरी ॲक्चुअली तिथे काय परिस्थिती आहे हे नगरसेवक या नात्याने समजून घ्यायला हवे होते. बरं, एकट्याने मारून कुठे गप्प बसला? जाणीवपूर्वक चार गाड्या गुंडांची टोळीच घेऊन टोळीचा म्होरक्या समोर जाऊन काही गुंड मेन गेटवर, काही पोर्चमध्ये, काही मेन डिलिव्हरी वॉर्डच्या बाहेर, काही आत कॅबिनमध्ये... 

इतके पूर्व प्लॅनिंग करून एखाद्याच्या लेकराला इतके बेदमपणे मारहाण कोणी करते का? म्हात्रेचे 7 वार, तीन किलोच्या रजिस्टरने डोक्यात मारलेली सूज आठ दिवस झाले अजून गेली नाही; त्याच्या बॉडीगार्डने अवघड जागी घातलेली लात व दोन वार, दुसऱ्या गुंडाने केलेले 8 वार आणि पांढरा टी-शर्ट घालून फुकटच्या तुकड्यावर जगलेल्या, मस्तीने माजलेल्या माणसाचे 12 वार... असे एकूण 31 वार माझ्या बाळावर केलेत. तेव्हा मला छत्रपती संभाजी महाराजांची आठवण झाली आणि हे दरिंदे औरंगजेबाच्या पाळलेल्या कुत्र्यासारखे वाटले. एका लेडीज डॉक्टरला, जी त्याच्या नातीसारखी आहे, तिच्यावर हात उगारताना कसला आलाय पुरुषार्थ? डॉ. सृष्टीच्या कानफटात जोरात लगावल्याने माझा मुलगा पुढे झाला आणि या अंदाजाचा/सगळ्या घटनेचा काहीच कारण नसताना बळी  ठरला. एखाद्या लेडीजवर अन्याय होताना पाहू शकत नाही, हेच आमचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्याच्या नसात मी पेरले आहेत."एनआयसीयू बेड अवेलेबल नसताना डॉक्टर लोक काय करणार? परिस्थिती काय आहे याचा विचार न करताच गुंडांना घेऊन जाऊन मारहाणी करणे अत्यंत चुकीचे आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना समाजाने वेळीच ओळखले पाहिजे, नाहीतर दररोज अशा कितीही घटना घडतील. 

माननीय कोर्टाला नम्र विनंती आहे की मग्रूर अशा म्हात्रे व त्याच्या गुंडांनी माझ्या डॉक्टर बाळाला व डॉक्टर सृष्टी, तसेच तिथल्या स्टाफ नर्स, मावशी ज्यांच्या ज्यांच्यावर हात उचलला, त्यांच्यासमोर लोटांगण घालून दोन्ही हात जोडून मीडियासमोर माफी मागावी... तरीही शिक्षा झालीच पाहिजे... यापुढे तरी अशी मगरुरी अंगात येताना शंभर वेळा विचार करेल. लोक साधे कुत्र्याला दगड मारू देत नाहीत आणि हा माजलेला, आपल्याच मस्तीत धुंद असलेल्या 73 वर्षाच्या गुंडाने 27 वर्षाच्या डॉक्टरवर हात उचलला. माझ्या बाळावर हात उगारून एका आईच्या काळजाला हात घातला आहे... याची सजा आदरणीय कोर्टाकडून मिळावी हीच अपेक्षा..."
"लोक बोलतात तो नगरसेवक व्यक्ती पैशाने जजला पण विकत घेतो... हा शब्द आपण योग्य निर्णय घेऊन खोडून टाका... कठोरातली कठोर कारवाई करावी ही विनंती... आणि असे जर झाले नाही तर यावरती एक न्यायालय आहे, तिथे मात्र एकेका क्षणाचा हिशेब चुकता करावा लागेल. तुमच्या कर्माची फळे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. 

माझा मुलगा फार मोठ्या मानसिक धक्कातून जात आहे. झोपेत पण डोक्यावर हात वर करतो बचावासाठी... त्याच्या जीवाला धोका आहे, माझ्यासुद्धा... म्हणून हे निनावी लिहीत आहे... यानंतर जर आम्हाला काही झाले, त्याला जबाबदार गुंड नगरसेवक असणार आहे. खरे तर आम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे. खरे तर पोलीस प्रोटेक्शन ज्या हॉस्पिटलमध्ये असायला हवे, तिथे जर असते तर हे सगळे घडलेच नसते. सर्वात मोठे नवल म्हणजे नगरसेवकासोबत जो पोलीस गार्ड होता, त्याने मारायची काय गरज? कायदा हातात घेताना या लोकांना लाजा कशा वाटत नाहीत? की कायदा नावाची गोष्टच राहिली नाही असेच वाटत आहे."

"माननीय न्यायालयाच्या समोर त्याचे वकील पोत्याने पैसा देऊन लावलेले, बनवाबनवी करून कितीही सांगतील; पण मला वाटते एकदा ऑडिओ क्लिपमधील अर्वाच्य भाषेत केलेली शिवीगाळ, केलेला भयानक प्रकार सर्व सीसीटीव्हीमध्ये साफ दिसत आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना दुसऱ्यांना मारण्याचे सर्टिफिकेट कोणी दिले याचीही चौकशी व्हावी. आम्हाला झालेला शारीरिक, मानसिक त्रास आम्ही कसे सहन करतोय ते आमचे आम्हाला माहीत. आम्हाला तुमच्या राजकारणाशी काही देणेघेणे नाही. आम्ही गरीब सामान्य माणसे. यापुढे प्रत्येकाला पडलेला प्रश्न आपल्या मुलाला डॉक्टर बनवावे की नाही...
याची एकच दिवस छाती दुखली की शेवटी डॉक्टर लोकांकडेच जावे लागले, दवाखान्यात व्हीआयपी ट्रीटमेंट घेत बसला. याची अक्कल तरी आली तर बरे होईल... स्वतःला वाचविण्यासाठी खोटे व्हिडिओ बनवत आहे. हॉस्पिटलमध्ये योग्य ट्रीटमेंट करीत नाहीत म्हणून काही पेशंट पैसे खाऊ घालून पाठवत आहे. हॉस्पिटलची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय. न्यायालय जो निकाल देईल तो देईल, भलेही तू पैशाच्या जोरावर सुटशील; पण वरती एक न्यायालय आहे, तिथे मात्र तुझी सुटका नाही हे लक्षात ठेव. क्योंकि भगवान के घर देर है पर अंधेर नहीं. - - "कसलीही चूक नसताना चार गुंडांचा वार सहन करणाऱ्या डॉक्टर बाळाची आई..."



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com