मुंबई महानगर कार्यक्षेत्रातील २२२ आदीवासी पाड्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्यापक स्वरूपात मुलभूत सुविधा पुरवाव्यात. बृहन्मुंबई महानगरपालिका विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवित असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अनुसूचित जमातीला मिळवून द्यावा, अशी सूचना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंह आर्य यांनी केली. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री. अंतर सिंह आर्य यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला शुक्रवार, दिनांक ३ जुलै रोजी भेट दिली. अनुसूचित जमातीला लोकसंख्यानिहाय मिळणाऱ्या सेवासुविधा, आरक्षणानुसार नोकरभरती व पदोन्नती यांचा आढावा घेतला.
महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या की, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने केलेल्या सूचनांची दखल घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे प्राप्त होणा-या तक्रारींची समन्वय अधिका-यांमार्फत दखल घेऊन सोडवणूक करण्यात येईल. अनुसूचित जमातीची सामाजिक व आर्थिक स्थिती यांबाबत केंद्र व राज्य शासनाकडून उपलब्ध होणा-या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी महानगरपालिकेत योग्यप्रकारे होत आहे की नाही याची देखरेख करण्याची जबाबदारी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाद्वारे होत असल्याचे श्री. राजीव सक्सेना यांनी बैठकीच्या प्रारंभी नमूद केले.उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येला उपलब्ध केल्या जाणा-या आरोग्य, वैद्यकीय, शैक्षणिक सुविधांची माहिती दिली. तसेच, महानगरपालिका बिंदू नियमावली, श्रेणीनिहाय पदसंख्या, नोकरभरती आदींबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष यांचे स्वीय सचिव राजीव सक्सेना, महानगरपालिकेचे सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, उप आयुक्त ( सामान्य प्रशासन) किशोर गांधीं, उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) श्रीधर चौघरी यांच्यासह राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष यांचे ज्येष्ठ सल्लागार आर. के. दुबे, संशोधन अधिकारी अंकित कुमार सेन, ज्येष्ठ तपासणीस गोवर्धन मुंडे, स्वीय सहाय्यक आर. एन. शर्मा यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या