Top Post Ad

नागरिकांना गडकिल्ले, धबधबे, धरणे, तलाव आणि नद्यांवर जाण्यास बंदीचे आदेश

 मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात होणाऱ्या जोरदार पावसामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर घरांमध्ये पाणी शिरले तर काही भागात दुर्घटना देखील घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत राज्यात 9 जणांचा बळी गेला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. तर धुवाँधार पाऊस, सोसाट्याचा वारा, काँक्रीटचा फास आणि अशास्त्रीय छाटणीमुळे ठाण्यात गेल्या २४ तासांत तब्बल ११० वृक्ष उन्मळून पडले. यासोबतच ३८ फांद्याही कोसळल्या. या पडझडीदरम्यान १४ झाडे व ६ फांद्या धोकादायक अवस्थेत असल्याच्या तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाल्या.

  लुईसवाडी सेवा रस्त्यानजीकच्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरून चालत जाणाऱ्या पांडुरंग भुवड यांच्यावर झाड कोसळले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आणि मीनल संख्ये घटनास्थळी दाखल झाले. रेपाळे यांनी भुवड यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, श्रीरंग सोसायटी येथील वृंदावन बस थांब्याशेजारी धोकादायक स्थितीतील झाड कापताना रेस्क्यू फायरमॅन अंकित यादव (३२) यांच्या पायाला कटर मशिन लागून दुखापत झाली. त्यांना ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अद्याप  मेट्रो सेवा सुरू झालेली नसतानाही ठाण्यातील गायमुख - कासारवडवली - वडाळा' या 'मेट्रो-४' आणि 'मेट्रो-४ अ' या महत्वपूर्ण स्थानक असणाऱ्या गायमुख मेट्रो स्थानकाचे पत्रे सोमवारी निखळले. सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका या स्थानकाच्या पत्र्यांना बसला. यामुळे सदर कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाणे शहराला मुंबईशी जोडणाऱ्या या मेट्रोची चाचणीसाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गायमुख स्थानकात दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीत या मार्गावरील गायमुख जंक्शन, गायमुख गाव, घोडबंदर रोड, कासारवडवली आणि विजय गार्डन स्थानकांपर्यंत मेट्रोची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर या मार्गावरील मेट्रो कामाच्या कासवगतीचा मुद्दा समोर आला. वर्ष उलटूनही या मार्गावरील मेट्रोसेवा सुरू झालेली नसताना सोमवारी या स्थानकावरील पत्रे निखळल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. सुदैवाने या प्रकारात कोणालाही इजा झाली नाही. 

कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये शहरांमध्ये रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर मुसळधार पाऊस पडला. परिणामी शिळफाटा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. विशेष म्हणजे रस्त्यालगत उभ्या असलेले चारचाकी वाहनं हे जवळपास पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. तसंच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यामुळे इथे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.  याच शीळ रोडच्या पुढे काटई नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं होतं. इथल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रशासनाला चक्क रस्त्यावरील डिव्हायडर तोडावा लागला आहे. यानंतर बदलापूर-काटई रस्त्यावर पुढे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. नेवाली नाका परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणासाठी बदलापूर-काटई रस्ता हा वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला. पाऊस कमी झाला किंवा थांबला आणि पावसाच्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान,नेवाली नाका परिसरात वाहतूक पोलीस पोहोचले आहेत.

मुसळधार पावसामुळे कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली असतानाच  पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने उल्हास नदीला पूर आला असून, पुरामुळे नदीपात्रात मुख्य जलवाहिनी तुटली आहे. त्यामुळे कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम परिसराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. पुढील ४८ तास दुरुस्तीसाठी लागणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.. मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील साई विहार संकुल इमारतीच्या तळमजल्यावर पाणी साचलं आहे. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. यामुळे घरातील फर्निचर आणि इतर सामानाचे नुकसान झाले आहे.  केवळ  कल्याण-डोंबिवली नाही तर अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, भिवंडी या परिसरातही जोरदार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम मुंबई-नाशिक महामार्ग भिवंडी बायपास येथून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या मार्गाला प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. अनेक तास वाहनं एकाच ठिकाणी रखडून पडले आहेत.

 या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व गडकिल्ले, धबधबे, धरणे, तलाव आणि नद्यांवर नागरिकांना जाण्यास बंदीचे आदेश दिले आहेत. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसासह ताशी 70 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. गेल्या 3 दिवसांतील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आदेश जारी केले आहेत.

ठाण्यातील मासुंदा तलाव  भरून ओसंडून वहात असलेला बातम्या वाचल्या . पण प्रत्यक्षात केवळ मासुंदा तलावाचे क्षेत्रफळ ठामपाने त्यांचा अधिकृत संकेऑतस्थळावर जाणूनबुजून टाकले नाही. याबाबत धर्मराज्य पक्षांकडून ३० मार्च २०२६ रोजी निवेदन पाठवून सर्व तलावाचे क्षेत्रफळ चौरस फूटात नमूद करावी अशी विनंती ठाणे महानगरपालिकेचे अधिकृत  संकेतस्थळाची स्क्रिनशॉट काढून ठामपा आयुक्त मा. सौरभ राव यांच्या कडे ईमेल केला होता. माझ्या माहितीनुसार ठाणे गॅझेट मधे जे क्षेत्रफळ आहे ते पहाता आता जेमतेम ७ % मासुंदा तलावाचे अस्तित्व आहे. तलावात बेकायदेशीर अतिक्रमण,मुतारी ,रस्ते ,सॅटीसचा पूल बांधल्यामुळे पदपथासाठी घेतलेला भाग, सौंदर्यीकरण साठी केलेले बांधकाम, मार्केट,  तसेच खासदारांच्या आग्रहाखातर शिवाजी मैदानावरची भव्यदिव्य प्रकल्प च नेहमीच तलाव थोड्या पावसाळ्यात भरून कष्टकरी करदात्यांचे नुकसान होणारच. ह्यासाठी आपले लोकप्रतिनिधीं आणि प्रशासन जबाबदार आहे. तसे होऊ नये म्हणूनच सदर गॅझेट मधिल उल्लेख केलेले क्षेत्रफळ आणि आज प्रत्यक्ष असलेले क्षेत्रफळ ठामपाने नमूद केले नाही ही ठामपाने आपल्या पारदर्शक तत्त्वाला तिलांजली दिली आहे. -  नितीन देशपांडे. (उपाध्यक्ष-धर्मराज्य पक्ष)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com