Top Post Ad

अरुणाचल प्रदेशातील भारतीय भूभागावर चीनचा कब्जा; केंद्र सरकार गप्प का?

 अरुणाचल प्रदेशातील तकसिंग भागातील भारतीय भूभागावरील चिनी अतिक्रमणाबाबत केंद्र सरकारला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनीसडेतोड प्रश्न विचारले. वंचित आघाडीच्या मुंबईतील कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांना याबाबत माहिती देताना ते म्हणाले अरुणाचल प्रदेशातील तकसिंग भागातील 'नाहा वेल्फेअर सोसायटी' या स्थानिक संस्थेने २६ जून २०२६ रोजी सुबनसिरी जिल्ह्याच्या उपआयुक्तांना पत्र लिहून म्हटले आहे की, २०२० पर्यंत भारतीय नागरिकांच्या वर्दळीचे असलेले भाग आता चीनने ताब्यात घेतले आहेत. आपल्या पत्रात, संघटनेने त्या ठिकाणांचाही उल्लेख केला आहे जिथे चिनी घुसखोरी झाली आहे आणि जिथे आता भारतीय नागरिकांचा प्रवेश अशक्य आहे. जर ही माहिती खरी असेल, तर हा केवळ सीमा सुरक्षेचाच नव्हे, तर देशाच्या सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी राष्ट्रासमोर आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करावी असे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.


भारत सरकारच्या गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाला या संपूर्ण प्रकरणाची माहिती असूनही, आजपर्यंत कोणतीही स्पष्ट सार्वजनिक प्रतिक्रिया आलेली नाही. या मौनामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा देशाच्या सीमांचे रक्षण करण्याबद्दल आणि 'डोळे लाल दाखवण्या'बद्दल बोलतात आणि त्यांच्या सरकारचे नेतृत्व खंबीर असल्याचे वर्णन करतात. पण जर चीनने खरोखरच भारतीय भूभागावर कब्जा केला असेल, तर केंद्र सरकार या मुद्द्यावर गप्प का आहे? सरकार कधी कारवाई करणार? असा प्रश्न अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर सरकारला घेरून जाब विचारण्याचे आवाहनही केले.

उपलब्ध माहितीनुसार, चीनने अरुणाचल प्रदेशातील दोन भागांमध्ये लष्करी बंकर बांधले आहेत आणि लष्करी उपकरणांच्या वाहतुकीसाठी दोन हेलिपॅडही उभारले आहेत. ही माहिती भारताच्या सुरक्षा व्यवस्थेसमोर एक अत्यंत गंभीर आव्हान उभे करते आणि यासाठी तातडीच्या राष्ट्रीय कारवाईची आवश्यकता आहे. भाजप नेतृत्व आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडूनही या मुद्द्यावर स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ माहितीची मागणी केली. त्यांनी सांगितले की, देशातील जनतेला सीमेवरील वास्तविक परिस्थिती आणि भारतीय भूभागाच्या संरक्षणासाठी सरकार कोणती ठोस पावले उचलत आहे, हे जाणून घ्यायचे आहे.

चीनने भारतीय भूभागावर अतिक्रमण केले असल्यास, सरकारचा तथाकथित 'लाल डोळा' दिसत नाही आणि '५६ इंची छाती' असलेल्या सरकारकडून कोणतीही निर्णायक कारवाई दिसत नाही, असा थेट प्रश्न त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशातील तकसिंग भागातील चीनच्या हालचाली आणि सीमेवरील वास्तविक परिस्थितीवर तात्काळ अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि भारतीय सीमा व नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com