टीपीएस-०६, म्युनिसिपल गार्डन परिसरातील महानगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय तोडण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन रिपाइंचे मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार यांनी आज एच/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त माननीय पल्लेवाड यांना सादर केले. टीपीएस-०६ म्युनिसिपल गार्डन परिसरातील सार्वजनिक शौचालय हे भीमवाडा व खोतवाडी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक सुविधा केंद्र आहे. परिसरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच गरजू रहिवाशांना या शौचालयाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असून, ते पाडल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे विवेक पवार यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.यावेळी नागरिकांच्या समस्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन सार्वजनिक शौचालय पाडण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सार्वजनिक स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा विचार करून सदर शौचालय तोडण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शौचालयाची आवश्यकता लक्षात घेऊन ते कायम ठेवण्याबरोबरच आवश्यक असल्यास त्याची दुरुस्ती व देखभाल महानगरपालिकेने करावी, भीमवाडा आणि खोतवाडी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित हा प्रश्न आहे. सार्वजनिक शौचालय तोडण्याचे आदेश तातडीने रद्द करण्यात यावेत. अन्यथा भीमवाडा-खोतवाडी येथील रहिवाशांच्या वतीने मुंबई महानगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन करून मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पवार यांनी आपल्या निवेदनातून दिला. या प्रसंगी परिसरातील नागरिकांसह वार्ड अध्यक्ष सुनील बाळासाहेब सूर्यगंध तसेच रिपाइं पदाधिकारी व उपस्थित होते.

0 टिप्पण्या