Top Post Ad

Filmcity प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे (क्रिएटर इकॉनॉमी) जागतिक केंद्र बनविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरातील प्राइम फोकसच्या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून, मुंबई सर्जनशील उद्योगांचे जागतिक केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.             फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रपट नगरी (फिल्मसिटी) च्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे - पाटील तसेच प्राइम फोकस समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईत जागतिक दर्जाची सुविधा उभारून जगभरातील मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगांना सेवा देण्याचा प्राइम फोकसचा संकल्प आज प्रत्यक्षात उतरला आहे. शासनाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य केल्याचे सांगून 'वेव्ह्स 2025' परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या एका वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला, ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहासामध्ये असंख्य प्रेरणादायी कथा दडलेल्या आहेत. या कथा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सक्षम सर्जनशील परिसंस्थेची गरज आहे. प्राइम फोकसची ही सुविधा त्या दृष्टीने देशासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  जगातील सर्वात मोठ्या चित्रपट सहनिर्मिती प्रकल्पांपैकी एक असलेल्या 'रामायण' चित्रपटाची निर्मिती या स्टुडिओमध्ये होत असल्याचा विशेष उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. भारतीय सर्जनशीलतेचा जागतिक स्तरावरील उत्कृष्ट नमुना म्हणून हा चित्रपट ओळखला जाईल,  युवा पिढीच्या सर्जनशील क्षमतेला वाव देणे, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे आणि मनोरंजन उद्योगासाठी सक्षम परिसंस्था उभारणे यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. फिल्मसिटीचे जागतिक दर्जाच्या सर्जनशील आणि मनोरंजन केंद्रामध्ये रूपांतर करण्याचा व्यापक पुनर्विकास आराखडाही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्राइम फोकसच्या उपक्रमाचे कौतुक करताना, संस्कृती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा प्रभावी संगम या प्रकल्पातून साकार झाल्याचे सांगितले. सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही विभागांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्राइम फोकसच्या या परिसरात संस्कृती आणि तंत्रज्ञान एकत्र येऊन समाजासाठी मूल्यनिर्मिती करणारे आदर्श उदाहरण पाहायला मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. 'ऑरेंज इकॉनॉमी'च्या संकल्पनेला प्राइम फोकसने प्रत्यक्ष आकार देण्याचे काम केले असल्याचे सांगितले. सर्जनशीलता, सांस्कृतिक समृद्धी आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून देशासाठी नवे मानदंड निर्माण करणाऱ्या या उपक्रमासाठी त्यांनी प्राइम फोकसच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात सर्जनशील उद्योगांना नवी चालना मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

  यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी 'वेव्ह्स 2025' परिषदेदरम्यान महाराष्ट्र शासन आणि प्राइम फोकस यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचा उल्लेख करत त्या कराराचेच हे फलित असल्याचे सांगून या माध्यमातून मुंबईत जागतिक दर्जाची सुविधा उभी राहिल्याचे नमूद केले. भारताकडे सर्जनशील आणि क्रिएटर इकॉनॉमी क्षेत्रात जगातील सर्वाधिक प्रतिभा, कल्पकता आणि समृद्ध कथाकथन परंपरा असल्याचे सांगून त्यांनी या सामर्थ्याच्या बळावर भारताला ऑरेंज इकॉनॉमीमध्ये जागतिक नेतृत्व मिळविण्याची क्षमता असल्याचा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने अल्पावधीत आवश्यक मंजुरी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे हा प्रकल्प साकार होऊ शकल्याचे त्यांनी सांगितले. 'वेव्ह्स 2025' दरम्यान जाहीर झालेल्या इतर गुंतवणूक आणि विकासविषयक वचनबद्धताही लवकरच प्रत्यक्षात उतरून त्याचा लाभ देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 प्राइम फोकसचे नमित मल्होत्रा यांनी मनोगतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन आणि फिल्मसिटी प्रशासनाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुंबईतील हा प्रकल्प प्राइम फोकसचे जागतिक मुख्यालय असून भारतीय म्हणून आणि मुंबईकर म्हणून तो अभिमानाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत जगातील सर्वोत्तम दर्जाची सुविधा उभारण्याचा संकल्प करण्यात आला आणि राज्य शासनाच्या पाठबळामुळे तो प्रत्यक्षात साकार झाला असल्याचे त्यांनी सांगितले. प्राइम फोकसच्या पहिल्या टप्प्याच्या यशानंतर दुसरा टप्पाही लवकरच पूर्ण करून भारताला जागतिक मनोरंजन आणि सर्जनशील उद्योग क्षेत्रात अग्रस्थान मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

            मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनीही प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या सुविधेचे कौतुक करताना, ‘वेव्ह्स 2025’ परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अल्पावधीत हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाल्याचे सांगितले. नमित मल्होत्रा आणि त्यांच्या संपूर्ण चमूने उभारलेली ही सुविधा केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम सर्जनशील सामग्री निर्मिती केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com