Top Post Ad

Thane महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेसाठी करण्यात आलेल्या संपूर्ण खर्चाचा पारदर्शक तपशील जाहीर करण्याची मागणी

 महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी स्पर्धकांकडून शुल्क आकारण्यात आले. हे शुल्क कोणत्या कायदेशीर तरतुदी, नियम, ठराव, शासन निर्णय अथवा सक्षम प्राधिकाऱयाच्या आदेशाच्या आधारे आकारण्यात आले, याचा खुलासा करावा. स्पर्धकांकडून प्राप्त झालेल्या एकूण शुल्काची रक्कम आणि त्यातून करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील सार्वजनिक करावा.  निविदा/कंत्राटाची रक्कम, कंत्राटदारास करण्यात आलेली देयके, पाणी, नाश्ता, मॅरेथॉन किट, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा व्यवस्था,रस्त्यावरील खड्डे बुजविणे, त्याची गुणवत्ता, वाहतूक व्यवस्था, जाहिरात व प्रसिद्धी तसेच इतर सर्व बाबींवरील करण्यात आलेल्या संपूर्ण खर्चाचा पारदर्शक तपशील जाहीर करावा.   अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे सरचिटणीस नितीन देशपांडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

अत्यंत गाजावाजा करून आयोजित करण्यात आलेल्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या नियोजनातील त्रुटी यंदाही समोर आल्या. स्पर्धकांची घटती संख्या, प्रमाणपत्रे आणि पदकांच्या वाटपातील गलथान कारभार, प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीसाठी स्पर्धा उशिरा सुरू होणे, तसेच पाणी आणि अल्पोपहाराच्या उपलब्धतेतील दिरंगाईमुळे  त्यामुळे महापालिकेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.   संबंधित कंत्राटाची निविदा प्रक्रिया, निविदेत सहभागी झालेले सर्व पात्र निविदाकार, निविदा मंजुरीची प्रक्रिया, निवडलेल्या कंत्राटदाराचे नाव, कंत्राटाची रक्कम, कामाचा आदेश तसेच संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची माहिती सार्वजनिक करावी.  या स्पर्धेचे कंत्राट ठामपाच्या एका महिला उपायुक्तांच्या पतीला मिळाल्याची चर्चा आहे. टक्केवारीच्या कारभारामुळेच  महापौर वर्षा मॅरेथॉनचा ढिसाळ कारभार झाल्याचा आरोप ठाणेकर करीत आहेत.  

स्पर्धेत 30 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात सहभागी स्पर्धकांची संख्या कमी दिसत होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही गर्दी वाढविण्यासाठी ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. सकाळी 6 वाजता 21 किलोमीटर गटातील स्पर्धा सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती उशिराने झाल्याने ही स्पर्धा सुमारे 20 मिनिटे उशिराने सुरू झाली. त्याचा परिणाम इतर गटांतील स्पर्धकांनाही सहन करावा लागला. स्पर्धकांकडून या बाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच, 21 किलोमीटरच्या मार्गिकेवर मार्गदर्शन करणारे फलकही अपुरे असल्याची तक्रार स्पर्धकांनी केली. 21 किलोमीटरची स्पर्धा पूर्ण केल्यानंतर आलेल्या अनेक स्पर्धकांना पदके उपलब्ध होऊ शकली नाहीत. त्याचबरोबर तीन किलोमीटरच्या स्पर्धेसाठी शालेय विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. ज्या ठिकाणी 21 किलोमीटरची स्पर्धा पूर्ण होत होती, त्याच ठिकाणी तीन किलोमीटर स्पर्धेतील विद्यार्थ्यांचीही सीमा रेषा निश्चित करण्यात आली होती.  

सुरुवातीला केवळ 21 किलोमीटरच्या स्पर्धकांसाठी पदकांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, तीन किलोमीटरच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या काही शालेय विद्यार्थ्यांनाही पदके देण्यात आली. त्यामुळे पदक वाटपात गोंधळ झाला. पदके न मिळाल्याने काही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मुख्य व्यासपीठासमोरच घोषणाबाजी केली. अखेर महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्यासह नगरसेवकांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी महापालिका मुख्यालयातही घोषणाबाजी केली. या सर्व प्रकाराला कारणीभूत असलेल्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई  झाली पाहिजे अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे.   

   तसेच सर्व लोकप्रतिनिधींना देण्यात आलेल्या मॅरेथॉन किटमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश करण्यात आला होता, त्यासाठी किती खर्च अपेक्षित/मंजूर करण्यात आला होता आणि स्पर्धकांना प्रत्यक्षात कोणत्या सुविधा व साहित्याचे वाटप करण्यात आले,  तसेच लोकप्रतिनिधी आणि स्पर्धक यांच्यासाठी किटच्या स्वरूपात किंवा गुणवत्तेत फरक ठेवण्यात आला असल्यास त्याचे कारण स्पष्ट करावे.  त्याचप्रमाणे स्पर्धेच्या आयोजनासाठी कोणकोणत्या विभागांना जबाबदाऱया सोपविण्यात आल्या होत्या, त्याबाबतचे आदेश/नियोजनपत्र, जबाबदार अधिकारी-कर्मच्रायांची नियुक्ती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांची तपासणी करण्यात यावी. नियोजनातील त्रुटी अथवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱयांची जबाबदारी निश्चित करून चौकशीअंती दोषींवर नियमानुसार आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे.  

मॅरेथॉन स्पर्धा `झेन अल्फा'ने गाजवली. या स्पर्धेचे शहरात फलक खूप होते; मात्र पदक नव्हते,  -- मनसे नेते अविनाश जाधव.  

एकीकडे मुलांच्या उत्साहावर विरजण घालणारे पालिका प्रशासन दुसरीकडे स्वतच्या सुखासाठी महापालिकेचा पैसा पाण्यात घालत आहे. हा थेट अन्याय असून शेकाप या व्हीआयपी संस्कृतीचा आणि पालिकेच्या चुकीच्या प्राधान्यक्रमाचा तीव्र शब्दात निषेध करत आहे, महापालिकेने हा वायफळ खर्च त्वरित थांबवून सर्वसामान्य जनतेच्या आणि मुलांच्या हिताला प्राधान्य द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल  --- ऋषिकेश तायडे (शेकाप)    

पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही प्रशासनाने अलिशान गाड्यांवर निधी खर्च केला पण, मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्यांना साधे मेडल देण्यासाठी निधी नाही,  नियोजनशून्य कारभारामुळे या चिमुरड्यांना त्यांचे हक्काचे पदकही मिळाले नाही. स्वतच्या हक्कासाठी या लहान मुलांना भर रस्त्यात ठिय्या आंदोलन करावे लागणे ही ठाण्याच्या संस्कृतीला आणि क्रीडा क्षेत्राला काळिमा फासणारी बाब आहे. --- केदार दिघे, ठाणे जिल्हाप्रमुख, शिवसेना   

21 किलोमीटरच्या स्पर्धकांना पदके देण्यास विलंब झाला, हे सत्य आहे. मात्र, त्यानंतर बल्लाळ सभागृहात पदकांचे वाटप पूर्ण करण्यात आले. तसेच, स्पर्धकांची आम्ही दिलगिरी व्यक्त केली.  --  मीनल पालांडे, उपायुक्त, क्रीडा विभाग, ठाणे महापालिका  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com